Monday, April 27, 2020

"माऊली आहे रं ती!"

*"माऊली आहे रं ती!"*
"आलं का गं पॉर कोलापूरास्न?", नेहमी प्रमाणेच सकाळी सकाळीच अंगणात आलेली आज्जी आमच्या आईला म्हणाली.
"आला आहे रात्रीच, थांबा बोलवते", आमची आई आज्जीला म्हणाली. 
आई मला म्हणाली शेजारची आज्जी आली आहे काय म्हणते ते बघ जरा. माझे काम टाकून मी अंगणात गेलो. अंघोळीला पाणी तापवायच्या चुलीपाशी आज्जी हात पाय शेकत बसली होती. अंगात खूप जुना पांढरा स्वेटर. हातात दोन तीन शिल्लक राहिलेल्या बांगड्या. पायात चप्पल नाही. कमरेत वाकल्यामुळे चालताना कायम साथ देणारी एक छोटी लाकडी काठी. एक डोळा पूर्णपणे मोतिबिंदूमुळे पांढरा झालेला. दुसऱ्या डोळ्यास नुकतीच मोतीबिंदूची लागण झालेली. आयुष्यभराच्या कष्टांमुळे कडक झालेले हात आणि सहज वाकवता न येणारी हाताची काही बोटे. आजोबांना जाऊन नुकतेच एक वर्ष झालेले. मुंबईला राहणारा तिचा एकुलता एक मुलगा, सून आणि एक पंधरा वर्षांचा नातू. गावाला आज्जी एकटीच आमच्या शेजारी त्यांच्या घरात एकटीच राहते. वय वर्षे पंच्याहत्तर, जख्खड म्हातारी. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला सांगतोय हे सगळं. गोष्ट तर पुढे आहे. असो.
आज्जी म्हणाली, "आरं लेका माझ्या पोराला  मिस कॉल दे की, आज त्याला सुट्टी आसल." आज्जी तिच्या पिशवीत ठेवलेला जुना मोबाईल मला देत म्हणाली.
मी म्हणालो थांबा जरा, देतो मिस कॉल. मी मिस कॉल दिला आणि आज्जी पाशी बसलो. तिच्यापाशी बसलं की तिला खूप आनंद होतो. आज्जी ला थोडे कमी ऐकू येते. मला लहानाचा मोठा होत असलेला पाहिला असल्याने आज्जीला माझ्याबद्दल खूप माया. आज्जी म्हणाली, "हाताच्या बोटात खूप ठसठस होतंय रं, दोन दिसापास्नी." मी म्हणालो दाखव बघू. आज्जीच्या बोटामध्ये जळणाचा काटा मोडला होता. तिला दिसत नसल्यामुळं तिने दुर्लक्ष केलं होतं आणि काटा तसाच आत राहिला होता. त्यामुळे तिला वेदना होत होत्या. मी आई कडून पिन मागून घेतली आणि आज्जीच्या हातातला तो काटा काढला, आज्जीला जराही दुखले नसावे इतका हळुवार. 
आज्जीच्या डोळ्यात दोन थेंब पाणी आले होते. तिला झालेल्या माझ्या स्पर्शाने ती आतून कळवळली होती. तिला या वयात आधार हवा होता. आज्जी एकटी पडली होती, तिला बाहेरगावी राहायला आवडत नव्हते. सून तिला घडत नव्हती. मुलग्याने नोकरी आणि बायको यांच्यापुढे हात  टेकले होते. आयुष्यभर अफाट कष्ट केले, ऊर फुटेस्तोवर शेती केली, बाप्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसले आणि आज तिला पाहायला कोणच नसावे याची खंत वाटली. 
तिला हवा होता एक आधाराचा हात. तिला हवी होती आपल्यांची साथ. तिलाही हवे होते नातवाचे प्रेम. तिलाही हवी होती सुनेची सोबत. आयुष्याच्या उत्तरार्धात तिलाही हवा होता आराम. मुलाच्या सोबत राहायला कोणत्या माऊलीला नको वाटेल. पण नियतीच्या फेऱ्यामध्ये तिचे म्हातारपण अडकले होते.
 "आरं माझ्याकडं आता ईना झालायस पोरा, आता माझं चार दिस राह्यलं", आज्जी मला सहजच बोलून जायची. त्यावेळी मनात वाटायचे की यांचे आता दिवस संपत आले आहेत, आपण तर तरुण आहोत, मनात आणलं तर अमर्याद मदत करू शकू. आपलं दुसऱ्याचं न करता आपल्याकडे मदत मागायला आलेल्या जीवाला मदत करणं हीच आपली संस्कृती आहे आणि उतारवयाकडे झुकलेल्या अशा मायाळू झाडांना मदत करणं आपलं कर्तव्यच आहे. आपलं स्टेटस, पद, प्रतिष्ठा, वय, वैचारिक भेद या सर्वांना बाजूला ठेऊन तुम्ही जेष्ठांना केलेल्या मदतीची पोहोच त्यांना झालेल्या आनंदातून घेऊ शकलात की बस, तुम्ही जिंकलात!
तिचे अश्रू वाहत नसले तरी काळजातील पाझर काही आटला नव्हता. शेवटी ती एक माऊलीच आहे आणि माऊलीला आपलं दुसऱ्याच मायेमध्ये तरी करता येत नाही. तिच्या बोटामध्ये रुतून बसलेला काटा तर मला काढता आला पण तिच्या काळजामध्ये रुतलेला काटा माझ्या हळव्या मनाला तश्याच वेदना देत राहिला. थंडगार वाऱ्याच्या हलक्या झुळुकीमुळे फुलत असलेल्या चुलीमधील विस्तवांकडे आज्जी एकटक पाहत होती. तिच्या मोबाईल ची रिंगटोन वाजायला लागली होती आणि या विचारचक्रात माझे लक्ष्य घरांच्या पायऱ्यांकडे गेले आणि मला दिसली आमच्यासाठी अहोरात्र झिजणारी माझी माऊली!!

शब्दांकन:-
अनिकेत भोसले
8975711080

"श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/राजपुरे" "त्याग आणि कष्टांतून गरुडझेप...!"



आप्तांचे आयुष्य सुगंधित आणि बहारदार बनवण्यासाठी चंदनरूपी वृक्ष जसा स्वतःला उगाळून घेत असतो आणि चैतन्य पसरवत असतो त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, रात्रंदिवस अपार कष्ट करून केवळ आणि केवळ त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे अनमोल दान केले, जे अहोरात्र झिजले ते चंदनरुपी वृक्ष म्हणजे श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे (दादा). दादांच्या जीवनाचा थोडक्यात उहापोह..
          दादांचा जन्म दि. ०१ जून १९५९ साली झाला. घरामध्ये दादांसहित पाच भावंडे होती. त्यांच्यात दादा आणि केशव हे दोघे भाऊ आणि कलावती, मीराबाई आणि सुनंदा या बहिणी. त्यावेळी घराचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती हेच होते. शेतीवरच कुटुंब चालत होते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील श्री. यशवंत केसू राजपुरे हे शेतकरी होते. तर मातोश्री अंजुबाई यशवंत राजपुरे! त्यांच्या आई कडक शिस्तीच्या असल्यामुळे सर्व मुलांचे संगोपन योग्य रीतीने झाले. वडिलांना आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं असं वाटतं होतं. मुलांना लागणारी शालेय फी भरण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी दिवसभर कष्ट करून मिळालेली मजुरी फक्त शिक्षणासाठी दिली. त्यामुळे या बिकट परिस्थितीत सुद्धा अपार कष्ट सोसून त्यांनी सर्व मुलांच्या शिक्षणावर भर दिला. दादांचे प्राथमिक शिक्षण पहिली १९६६ साली तर पाचवी १९७० साली दरेवाडी येथे झाले. त्यानंतरचे सातवी चे शिक्षण १९७२ साली कणुर या गावी तर हायस्कूल चे आठवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण १९७५ साली बावधन हायस्कूल, बावधन या ठिकाणी झाले. या वेळी सर्व राजपुरे कुटुंब अनपटवाडी ता. वाई येथे वास्तव्यास आले.
          दादा लहानपणापासूनच शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. दादांचा मूळचा स्वभाव खूप रागीट होता. ही देणगी त्यांना उपजतच त्यांच्या आई कडून मिळालेली होती. त्यानंतर दादा जसजसे मोठे होत गेले हा रागीट स्वभाव अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या मुळे अतिशय शांत होत गेला. दादांनी सन १९७८साली त्यांचे महाविद्यालयीन बारावी चे शिक्षण शिंदे हायस्कूल, वाई येथे घेतले. सन १९८१ साली बी. कॉम. ची पदवी आणि सन १९८३ साली एम. कॉम. ची पदवी वाई येथील किसनवीर महाविद्यालय मधून प्राप्त केली. दादांचे  शिक्षण म्हणजे अपार कष्टाचा नमुना आहे. दिवसभर वडिलांबरोबर शेतीत कष्टाची कामे करून दादा रात्रीचा अभ्यास करत असत. परत दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम जवळजवळ पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चालू राहिला. दादा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण मिळवून प्रथम यायचे. यामागील त्यांचे जिद्द आणि चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. दादांच्या शिक्षणासाठी त्यांचे दाजी सदाशिव शिर्के यांनी वेळोवेळी हवी ती मदत आणि मानसिक आधार दिला त्यामुळं दादा उच्चशिक्षित होऊ शकले. त्याकाळी गावात भीमा अण्णा, अर्जुन दादा आणि लाला भाऊ ही मंडळी ग्रॅज्युएट झाली होती. अनपटवाडी गावामध्ये शिक्षण क्षेत्रात दत्तबापू नंतर दादांनी आपल्या हुशारीने मान मिळवला. दादा म्हणजे गावात पदव्युत्तर शिक्षण घेणारी द्वितीय व्यक्ती होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि शेतीवर अवलंबून असूनही आपल्या भावंडांच्या शालेय शिक्षणाकडे दादांनी विशेष लक्ष दिले. लहान भाऊ केशव हा शाळेत अत्यंत हुशार आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याच्या शिक्षणावर दादांनी लक्ष केंद्रित केले.
          दादांनी स्वतःच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुंबई मध्ये सुध्दा नोकरी शोधली पण अपयश आले. दादांनी फॉरेस्ट विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. दिवसभर काबाडकष्ट आणि रात्रभर अभ्यास असा दिनक्रम सतत चालू ठेवला होता. ज्यावेळी ते परीक्षेला गेले तेव्हा पेपर लिहीत असताना अशक्तपनामुळे त्यांच्या डोळ्यांच्या समोर अंधार पसरला आणि त्यांना पेपर संपूर्ण लिहिता आला नाही. पदवी पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये मिळवणारा विद्यार्थी कमी दिसत असल्यामुळे पेपर अर्धवट लिहून परत आला. दादांना त्या वेळी नशिबाने साथ दिली नाही परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवला.
          सन १९९५ साली वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली. आता शिकत राहिले किंवा नोकरी शोधत राहिले तर भावंडांची शिक्षणे अर्धवट राहतील म्हणून दादांनी नोकरीचा शोध बंद केला कारण त्यांना सतत वाटत होते की " दादा ने नोकरी केली असती तर केशव (अप्पा) शिकला नसता!" त्यामुळे दादांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. केशवच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दादांनी केशवला आपल्या बहिणीकडे आणि दाजींकडे खंडाळा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी ठेवले. केशवने १९९२ साली लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बी. एससी. फिजिक्स ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये मिळवून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. केशवच्या या यश्यामुळे दादांच्या कष्टाचे सार्थक झाले.  पुढे केशवने १९९४ साली स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्टांनी शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र या विषयाची कठीण समजली जाणारी एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने लीलया मिळवली. तद्नंतर २००० साली अत्यंत परिश्रमाने आणि दादांच्या आशीर्वादाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एचडी. ही पदवी मिळवली. या सर्व यशशिखरांमागे दादांची समर्थ साथ, आधार आणि पाठिंबा होता. वडिलांचे स्वप्न दादांनी केशवला उच्चविद्याविभूषित करून पूर्ण करून दाखवले.
              दादांच्या पत्नी सुरेखा बाळासाहेब राजपुरे. त्यांनी दादांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक वळणावर खंबीर साथ दिली. वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांचा संसार यथायोग्य जोपासला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दादांची तिन्ही मुले कर्तबगार आणि कर्तुत्ववान आहेत. दादांचा मुलगा कु. आकाश बाळासाहेब राजपुरे हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार! आई वडिलांच्या कष्टांकडे पाहात त्याने आज जे यश मिळवले आहे ते अनपटवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यास पात्र आहे. तो सध्या मुंबई महानगरपालिका मध्ये अभियंता या पदावर कार्यरत आहे. अनपटवाडी गावातून मुंबई महानगरपालिका मध्ये प्रथम अभियंता होण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच मुलगी वृषाली बाळासाहेब राजपुरे ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून एम.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. आपल्या मुलांचे शिक्षण दादांनी पोटाला चिमटा काढून, काटकसर करून आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवले.
          दादांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा भाऊ केशव आणि बहिणींची साथ कायम मिळाली. दादांच्या बहिणी फुलाबाई शिर्के (म्हसवे), कलावती यादव (खंडाळा), शारदा निंबाळकर (वहागाव), मीराबाई ढमाळ (अंबारवडी), सुनंदा मतकर (विखळे) या सर्वांनी नेहमीच मानसिक आधार, प्रेम आणि जिव्हाळा दिला. हे प्रेम आणि आधार दादांना नव्याने आयुष्याशी झुंजण्याची ताकत देत होता.
          दादांचा लहान भाऊ केशव हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र अधिविभाग मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू आहे. केशवचे भौतिकशास्त्र या विषयातील संशोधनामध्ये देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त आणि बहुमूल्य कार्य आहे. एकंदरीतच केशवच्या यशामागे त्याचे वडील बंधू दादांचे अनेक आशीर्वाद आणि खंबीर साथ आहे. दादांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून केशव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
           दादांची तिन्ही मुले शिक्षित आणि स्थिरस्थावर आहेत. त्यांचे बंधू संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. दादांनी श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या भावंडांना तसेच मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कारित करून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. या जीवनप्रवासामध्ये आज दादा सुखी आयुष्य जगत आहेत. अपार कष्टांनी मिळालेल्या या अतुलनीय यशामुळे दादांची छाती नेहमीच गर्वाने फुलते! सर्व भावंडे आणि आपल्या मुलांचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नींची कणखर साथ, आधार, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांची जोड मिळाल्याने दादांना आपले आयुष्य सार्थकी लागले याचाही अभिमान वाटतो. दादांच्या संघर्षाची कहाणी भावी पिढ्यांच्या जीवनात चैतन्याची आणि कष्टाची ठिणगी बनेल यात तिळमात्र शंका नाही!
          दादांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...

शब्दांकन:
अनिकेत भोसले