Wednesday, December 30, 2020

सरत्या दशकाचा निरोप घेताना प्रिय पप्पांना पत्र....

प्रिय पप्पा...

          प्रिय पप्पा आज २०२० वर्षाचा शेवटचा दिवस. सरते शेवटी तुमच्या आठवणींच्या भाराने माझ्या पापण्यांचा धीर परत एकदा सुटला आणि तुम्हाला पत्र लिहावेसे वाटले. माझी खूप आठवण येत असेल ना तुम्हाला. तुम्ही देवापाशी जाऊन दहा महिने झाले. तुम्हाला आजही आठवत असेल ना आपली शेवटची भेट, दहा महिने उलटून गेले तरी कालचीच वाटणारी. "माझी कमी भासू देऊ नको, तू माझा खंबीर मुलगा आहेस, मृत्यू कोणाला नाही, हे जुने झालेले शरीर बदलून परत नव्याने सुरुवात करीन, रडायचं नाही, मी तुला सोडून कधीही जाणार नाही, परत येईन ! अगदी कालच बोलला होता तुम्ही हे सर्व. मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतोय. काळजी करू नका. पण मला परत एकदा भेटायला याल का?

          "तुमचा श्वास थांबला आहे" मी ऐकलेलं हे वाक्य आठवलं की मनाचा आणि हृदयाचा थरकाप अजूनही उडतो. भर उन्हात हात - पाय बर्फासारखे थंड पडतात आणि ऐन थंडीत दरदरून घाम फुटतो. शेजारच्या जगाचे भान राहत नाही.  पप्पा, तुमच्याकडे येताना प्रत्येक पाऊल खोल दरीत गेल्याचा आणि अंगातून सर्व ऊर्जा गेल्याचा अनुभव मला विसरता येत नाही. बाप असल्याच्या आणि आपण पोरके होण्याच्या मध्ये अगदी थोडा काळ असतो. हा काळ कधीही दयाळू नसतो. तुमचं सर्वस्व, तुमचं प्रेम, भावना, नातं आणि अस्तित्व ओरबाडून नेणारा निर्दयी काळ या वर्षी मला पाहायला मिळाला. मृत्यू पुढे आर्जवे शून्य होतात. यावर्षी मृत्यू पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तो येतो तेव्हा कोणाचंही ऐकत नाही. मात्र जाताना कानशिलात अशी चापट मारून जातो की त्याच्याशिवाय दुसरे काही सत्य असेल याचे भानच राहत नाही. तुम्हाला शक्य असल्यास त्याला शिक्षा करा, खूप शिक्षा करा, त्याने मला खूप रडवले आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये माझ्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची विचारपूस करणारे तुम्ही, आज माझ्या न थांबणाऱ्या अश्रुंच्या धारांसाठी तुमच्याबरोबर गेलेल्या मृत्यूला शिक्षा कराल ना? पप्पा मला एकदा परत दिसाल का ?
          पप्पा खर सांगा, एवढ्या लवकर जाणं तुम्हाला तरी पटलं का. मला इथे एकटे सोडून जाताना तुम्हाला थोडी भीती वाटलीच असणार. तरी असं काय महत्वाचं काम निघालं तुमचं की तुम्ही अजून परत आलाच नाहीत. एवढी धडपड केली तुम्ही मुलांसाठी आणि संसारासाठी, अर्धवट सोडून जाताना तुम्हालाही त्रास झालाच असणार. मी पहिलीत असो की नोकरीमध्ये घरातून बाहेर जाताना नियमित माझा पापा घेऊन सावकाश जा आणि नीट ये म्हणणारे तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये मला परत कधीच दिसत नाही . किती किती शोधलय मी तुम्हाला या दहा महिन्यांत. पण तुम्ही दिसत नाही. पण माझ्याजवळ असल्याचा भास नेहमी होतो. तुम्हाला शोधून दमलो की रात्र पसरते. मी रात्रीची वाट पाहत असतो. पप्पा मला तुम्ही रोज रात्री माझ्या स्वप्नांमध्ये भेटायला येता त्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आणि धन्यवाद. न चुकता तुमच्या बोलण्याची, कामांची, आयुष्याची आंदोलने माझ्या स्वप्नात होत असतात. मग जाणवतं की तुम्ही जरी माझ्याजवळ नसलात तरी माझ्यामध्ये आहात. पप्पा तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहाल ना? तुमच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही हो.

          दादाच्या बाळाची वाट तुम्ही आतुरतेने पाहिली होती ना. बाळाच्या चाहुलीने केवढा आनंद झाला होता तुम्हाला. या वर्षी एकदाच बाबा बाबा हे शब्द कानावर पडण्यासाठी तुम्ही कासावीस झाला होतात. तुम्ही गेल्यानंतर सहा महिन्यांनी बाळ घरात आले आहे. त्याला आई, वडील, आजी, मावशी, आत्या, काका कोण असतात हे नंतर कळेलच पण बाबा कोण आणि काय असतात ह्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही मला ताकद द्याल ना?

          माझ्या सर्व यशांमधे शाबासकी देऊन पाठ थोपटणारे तुम्ही, माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवून सहशिक्षकांना खुले आव्हान देणारे, माझ्या शिक्षकी पदवीच्या प्रवेशासाठी मला नेणारे, तुम्ही सांगितलेली पदवी मी मिळवली आहे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मला शाबासकी देण्यासाठी कधी येणार आहात ते कळवा तुमची प्रकर्षाने वाट पाहत आहे. पप्पा तुम्ही नक्की याल ना?

          सगळ्यांशी बोलतोय पण पप्पा म्हणून हाक मारू शकत नाही. तुम्हाला अनुभवतोय पण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही. परंतु मला विश्वास आहे की तुमचे आमच्यावर लक्ष आहे. नेहमी शुभाशीर्वाद आहेत. माझ्या आयुष्याची तुम्ही पाहिलेली स्वप्ने येत्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. काळजी नसावी. अश्रू थांबत नाहीत आणि शब्दही. मला माहित आहे की माझं अश्रू ढाळत बसणं तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळे अधिक त्रास न देता पाठीशी राहण्याच्या वचनावर पत्रसमाप्ती करतो. 

काळजी घ्या पप्पा !

तुमचा लाडका मुलगा,
अनिकेत



Friday, September 4, 2020

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौ. सोनवणे बाई !

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

जन्म झाल्यानंतर मानवाच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ झपाट्याने व्हायला सुरुवात होते. सर्वप्रथम मुलाला त्याची आई खूप जवळची असते. माताच त्याची प्रथम गुरु असते. आईकडूनच मुले उच्चार, भाषा आणि हावभाव असे बरेच काही शिकत असतात. वय वर्ष पाच ते सहा वर्षांपर्यंत मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास बऱ्यापैकी झालेला असतो आणि या वयातच त्याला आपली प्रथम गुरु आईस सोडून शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. हा कालखंड खूपच नाजूक असतो. या कालखंडामध्ये शिक्षकांची तारेवरची कसरत होत असते. मुलाला त्याची आई ज्याप्रमाणे वागणूक देत असते, तशीच वागणूक त्याला शाळेतील बाईंकडून अभिप्रेत असते. तीच माया आणि वात्सल्य हवे असते. हे सर्व मुलाला मिळावे आणि तो शिक्षण क्षेत्रात टिकून राहावा यासाठी शाळेतील कार्यतत्पर शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या शिक्षण आणि आयुष्याचा श्रीगणेशा करणाऱ्या माझ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई या ही एक कार्यतत्पर शिक्षिका, त्यांच्याविषयी माझे मनोगत आणि कृतज्ञता !

माझ्या शिक्षणाची सुरुवात सन २००१ मध्ये झाली आणि याच कालखंडात माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षक म्हणून लाभल्या, या गोष्टीबाबत मी नेहमीच देवाचा ऋणी राहील. "बाईंनीच माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ गुणवत्तापूर्ण रीतीने रोवली होती", हे सांगताना अभिमानाने उर भरून येतो. इयत्ता पहिली ते चौथी या महत्त्वाच्या वर्षांचे शिक्षण आणि संस्कार बाईंनी मला दिले की जे आजही आदर्शवत आहेत. हेच संस्कार आणि शिक्षण मी आज माझ्या विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज जे काही आहे ते फक्त सौ. सोनवणे बाई यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारांमुळेच हे मी छातीठोक पणे सांगू शकतो.

शिक्षणाच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये माझ्या आईने मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगांव येथे  प्रवेश घेतला. सन २००१ पासून इयत्ता पहिलीपासून या शिक्षणप्रवासाला सुरुवात झाली. सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. आम्हाला सर्वप्रथम आमचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता अश्या सर्व गोष्टी शिकवल्या. बोटाला धरून ज्याप्रमाणे आई बालकाला चालायला शिकवते त्याप्रमाणे आमची शिक्षणातील सुरुवात बाईंनी बोटाला धरून केली. कपडे नेहमी स्वच्छच घालायला हवेत, कपडा फाटलेला असेल तरी चालेल पण मळका असू नये, स्वतःचे बस्कर हवे, हाता - पायाची नखे कापायलाच हवीत, केस कापून नीट विंचारलेले असावेत, डबे हात स्वच्छ धुवून खावेत, जेवताना खाली सांडायचे नाही, कचरा करायचा नाही, वर्ग स्वच्छ ठेवावा अश्या चांगल्या सवयी अगदी लहानपणापासून लावल्या होत्या. आमचा वर्ग, सर्व विद्यार्थी आणि बाई हे एक आदर्शवत कुटुंबच झाले होते. 

सौ. सोनवणे बाई साधी राहणी आणि उच्च विचासरणी या तत्वाला धरुनच आम्हाला घडवत होत्या. त्या अतिशय प्रेमळ, मायाळू, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या, चाणाक्ष तसेच प्रसंगी कडक आणि शिस्तप्रिय सुद्धा होत्या. त्यांच्या या सर्व गुणांचा  सकारात्मक परिणाम आमच्यावर नकळत होत होता. मुले नेहमी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकाने नेहमीच आपले वागणे हे आदर्शवत ठेवले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. 

आम्हाला आमचे शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावे यासाठी बाईंचा नेहमीच प्रयत्न असे. अगदी पोटतिडकीने जे - जे शक्य आहे ते आमच्यासाठी करत असत. आमच्यासाठी अंकलीप्या, पेन्सिल्स आणण्यापासून ते चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे सराव पेपर उपलब्ध करण्यापर्यंत बाईंनी आम्हाला सर्व मदत केली आहे. वर्गात सर्वांना आठवड्याला बाई पेन्सिलचे आकडे द्यायच्या, त्याची सर आजही कोणत्या पेनाला येत नाही. बरोबर उत्तराला शाबासकी, बक्षीस आणि टाळ्यांचा कडकडाट मिळायचा. बाई वर्गाचे मंत्रिमंडळ बनवून कामे वाटून देत असत. वर्गात गट पाडलेले असायचे. त्यानुसार गटप्रमुख याने संपूर्ण गट नियंत्रणात ठेवणे, त्यांची माहिती ठेवणे इत्यादी कामे असत. यातून बाईंनी नेतृत्वगुण आमच्यामध्ये बानवले. बाईंची शिकवण्याची पद्धत निराळी होती. त्या अनुभव देत शिकवत असत. मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गातून विविध उदाहरणे देऊन अध्यापन करीत असल्यामुळे अध्यापन सफल होत असे. वर्गात शिकवताना बाई मुलांना कल्पनाविश्वात घेऊन जात आणि मुले भान हरपून जात. बाईंनी कोणत्याही क्षणी म्हटले की,  "आज गोष्ट ऐकणार काय?" त्याक्षणी संपूर्ण वर्ग सगळा आळस झटकून, असेल ते वही पुस्तक बाजूला ठेवून, हात बांधून बाई सांगणार आहेत ती गोष्ट ऐकायला तयार असायचा. ही गोष्ट सोपी नाही. यासाठी अध्यापन हे विद्यार्थ्यांचे वय, आकलन आणि आवड यांचा विचार करून करावे लागते. अवधान खेचण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची ही कला बाईंकडे होती. गोष्ट चालू असताना संपूर्ण वर्ग संमोहित झाल्यासारखा एकाग्र चित्ताने बाईंच्या गोष्टीकडे कान देऊन ऐकत असायचा. हे कौशल्य बाईंकडे होते आणि खरंच त्याबाबतीत आम्ही नशीबवान आहोत कारण आम्हाला कल्पनाविलास आणि परिकल्पनेतून आकलन करून घेण्याची सवय या गोष्टींमुळेच लागली आहे.

वर्गात वार्षिक नियोजन लावणे, मुलांना ते वाचावयास सांगणे, यातून मुलांना चौकस बनवण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या आकाराच्या कागदाच्या रंगीत पताका कापणे, वर्गात उंचावर मापे घेऊन आडवे - उभे दोरे बांधणे, त्यांवर पताका चिकटवणे यांमध्ये मार्गदर्शन करणे, यांतून मुलांच्यात गट आणि सहकार्य वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न, स्वतःची कामे स्वतः करणे, कपड्याला बटणे लावणे, कपडे शिवणे, कापडी पिशव्या शिवणे अशी अनेक स्वावलंबाची कामे करण्यास शिकवले,  वर्गात फलकलेखन करण्यास प्रत्येकाला संधी देणे, मोठ्याने वाचण्यास सांगणे, गट पाडून प्रश्नोत्तरे आणि त्यांचे गुण फळ्यावर लिहून चुरस वाढवणे, प्रश्नमंजुषा आणि गुणदान करणे असे विद्यार्थ्याने स्वतः पुढे येऊन करावयाचे अनेक उपक्रम बाईंनी राबवले होते आणि आम्हाला अष्टपैलू बनवण्याचा जणू चंगच बांधला होता.

बाईंचे अभ्यासाबरोबरच आमच्या शारीरिक विकासाकडे पण खूप लक्ष असायचे. दर शनिवारी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर आमच्या वर्गात व्यायामाचा आणि योगासनांचा खास तास चालू होई. प्रत्येकाने आप आपले बस्कर घेऊन यायचे, जागा तयार करायची आणि बाईंच्या पाठोपाठ आसने करायची. सर्व आसने करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असे. सर्व आसने झाल्यानंतर शेवटी शवासन असायचे. या आसनात असताना बाईंनी दिलेल्या सूचना अजूनही जश्याच्या तश्या आजही योगासने करताना आठवतात. बाईंनी दिलेला हा अनमोल ठेवा आजही मी जपला आहे. अभ्यासाबरोबर खेळातही आपण पुढे पाहिजे यासाठी खेळाच्या तासाला वेगवेगळे खेळ घेतले जायचे. या कालखंडात एकही असा दिवस नसेल की ज्या दिवशी बाईंनी आम्हाला नवे काही शिकवले नसेल. 

शालेय अभ्यासक्रमात असणारे मुख्य विषय जसे की गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांत आणि सर्वच भाषा विषयांत बाई अत्यंत तरबेज होत्या. त्यांनी आम्हालाही या विषयांत तरबेज कसे होता येईल याचे मार्गदर्शन केले आणि तसे प्रयत्न केले. चित्रकला, निबंधलेखन, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, कलाकुसरीचे काम इत्यादी मध्ये आवड निर्माण केली. ही प्रत्येक गोष्ट आपणास त्यावेळी जरी अवघड वाटत असली तरी तिचे दूरगामी परिणाम चांगले आणि उपयुक्त असतात हे मला आज समजत आहे. याच छोट्या -छोट्या गोष्टींमधून शिकून आजचा मी तयार झालो आहे. बाईंनी हे गुण मला त्यावेळी दिले आहेत की जे अजूनही उपयुक्त आहेत.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या तयारीसाठी बाईंनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. शाळेतील तास झाल्यानंतर मुलांचा अजून सराव होण्यासाठी ज्यादातास विनामोबदला बाईंनी सुरू केले. यामध्ये विविध क्लुप्त्या, सूत्रांचा वापर, योग्य अंदाज अश्या अनेक नवीन गोष्टींचे अध्यापन होत असे. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान आणि गणितामध्ये आम्हाला परिपक्व बनवले. तासांसाठी आम्ही बाईंच्या घरी शाळा सुटल्यानंतर जात असू. बाई वाई वरून विविध सराव चाचण्या मागवत असत. आम्हाला ओळीने बसवून अगदी कडक शिस्तीने त्या सोडवून घेतल्या जात असत. अखेर बाईंच्या प्रयत्नांना यश आले आणि आमच्या वर्गातील सर्वांना खूप छान गुण मिळाले होते. बाईंचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असायचे. त्याचे चांगले - वाईट गुण, सवयी, आवडी सर्व बाईंना माहीत असायच्या. आमच्याकडुन काही चुका झाल्याही पण योग्य समझ आणि वागणूक देऊन आम्हास घडवले. त्यामुळे प्रत्येकाचे मूल्यमापन आणि व्यक्तिमत्व विकास योग्य रीतीने झाला.

आम्हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण, मूल्यशिक्षण, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, काटकसर आणि भूतदया अश्या अनेक जीवनोपयोगी बाबींचे रोपण त्या लहान संस्कारक्षम वयात सौ. सोनवणे बाईंनी केले आणि आम्हाला पुढील शिक्षणासाठी आमच्या पायावर उभे केले. त्यांनी आम्हाला भविष्याच्या दृष्टीने आणि पुढील वाटचालीचा मागोवा घेऊनच शिकवले आहे. बाईंनी त्यांच्या बदली होण्याच्या अगोदरच्या कालावधीत आम्हाला म्हणजे विविध विषयांत तेज असणाऱ्या मुलांना त्या- त्या विषयांच्या उच्च वर्गांच्या शिक्षकांची भेट घालून दिली होती. यांच्यावर लक्ष ठेवा हे माझे आवडते आणि होतकरू विद्यार्थी आहेत असे बजावल्याचे आजही मला आठवते. आपल्या विद्यार्थ्यांची अशी काळजी घेणारा शिक्षक लाभणे हेच आमचे भाग्य !

सन २००१ ते २००५ ही वर्षे बाईंनी आम्हाला घडवण्यात घालवली आहेत. ही वर्षेच खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याची पायभरणीची वर्षे ठरली आहेत. आम्ही चौथी पास झाल्यानंतर बाईंची अचानक बदली झाली. सगळा वर्ग हिरमुसला होता. चार वर्ष ज्या बाईंनी आईसारखे वात्सल्य देऊन आम्हाला जपलं होतं त्या बाई आम्हाला सोडून दुसऱ्या शाळेसाठी निघाल्या होत्या. सर्वांचे दुःख सारखेच होते. पण त्या वयात ते दुःख फक्त अश्रुंच्या माध्यमातून व्यक्त होत होते. बाई अजून खूप इयत्ता आमच्याबरोबर असायला हव्या होत्या हीच खंत मनाला लागून राहिली होती. त्यादिवशी सर्वांनी बाईंना निरोप दिला आणि बाई आमच्या सर्वांच्याकडे अनेक आठवणी ठेवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ झाल्या..!

आजही जेव्हा बाईंची भेट होते तेव्हा आई नंतर मिळालेल्या खऱ्या गुरूची आठवण होते. त्यांच्याशी किती - किती बोलावे असे वाटते, माझा आनंद गगनात मावत नाही. कारण हीच ती शाळामाऊली आहे जीने मला जपलं, तयार केलं, लढण्यास शिकवलं, जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणा देऊ केला आणि स्वावलंबी बनवलं. आजच्या या पवित्र दिनी बाई आपणास शतशः वंदन आणि सादर प्रणाम करतो.

आज ५ सप्टेंबर शिक्षकदिन आपल्या प्रती आदरभाव आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपण आम्हास एक उत्कृष्ठ शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून लाभला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सस्नेह नमस्कार !

शिक्षकदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ! आपणास आरोग्यपूर्ण आणि आनंददायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आपला विद्यार्थी
अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०


Sunday, July 5, 2020

गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। 
गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

         आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपुरे सर

सर्व गुरुबांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रणाम.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या माय मराठी समूहातील प्रत्येकाने आपल्या गुरुंविषयी आदर आणि  कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या विषयी आपल्याच शब्दात मनोगत व्यक्त करावे असे ठरले ही कल्पनाच मुळात गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा वापर करून त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठीची संधी आहे !

माझ्या वर्तमान आणि गत आयुष्यामध्ये मला असंख्य गुरु लाभले. पावलोपावली आपल्या ज्ञानात आणि अनुभवात भर टाकणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय. असे अनेक गुरु मला आजपर्यंत लाभले त्याबद्दल जगतनियंत्याचे आभार मानतो. या सर्व गुरुजनांना   गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रणाम.

माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी आणि आवडते गुरु म्हणजे डॉ. केशव राजपुरे सर ! आयुष्याच्या महत्वाच्या ठिकाणी ते मला लाभले. लहान मुलाला जसा आईचा ओढा असतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपल्या जन्मस्थळाचा, आपल्या प्रदेशाचा आणि आपल्या माणसांचा लळा असतो आपुलकी असते आणि म्हणूनच सन २०१६ साली विद्यापीठात प्रवेश घेत असताना आपल्या अनपटवाडी गावचे सुपुत्र राजपुरे सर हे  फिजिक्स विभागात प्राध्यापक आहेत असे समजले आणि माझी पावले आपोआप त्यांच्या शोधात निघाली. विचारपूस केल्यानंतर सरांची केबिन पहिल्या मजल्यावर आहे असे समजले. परवानगी घेऊन आत गेलो. ही आमची प्रथम भेट. तेव्हा जराही वाटले नाही की, भन्नाट गुणांची खाण असलेले हे सर आपले सर्वात मोठे गुरु होतील !

सरांनी ओळख विचारली. विचारपूस केली. अभिनंदन केले आणि वेळेत हजर होण्याबाबत सांगितले.  एका साध्या विद्यार्थ्याशी त्या दिवशी झालेली ओळख सरांनी आजपर्यंत जपली आहे. सरांनी या काळात भरपूर संस्कार केले आणि संस्कार करणे ही प्रक्रिया अजून चालूच आहे. हे तेच गुरु आहेत ज्यांनी आम्हाला प्रथम ईमेल आयडी तयार करणे, इतरांना ईमेल पाठवणे, ईमेल वाचणे इ. गोष्टी शिकवल्या. तुम्हाला हे वापरता आलेच पाहिजे असा अठ्ठहास ! सरांनी स्वतः मला कॉम्प्युटर मधील एमएस एक्सेल, पावरपॉइंट शिकवले आहे. पावरपॉइंट पीपीटीस कमी वेळात कश्या बनवायच्या, त्या प्रभावी कश्या होतील, त्यात कोणत्या चुका नसाव्यात हे सर्व शिकवले. मला अवांतर वाचनासाठी पुस्तके दिली. माझ्या कुवतीनुसार सर माझ्यावर नेहमी छोटी-मोठी कामे सोपवत असत. त्यातून आत्मविश्वास वाढत असे. चुकले तर सर न रागवता परत सांगत असत. असे गुरु लाभणे म्हणजे आमचे भाग्यच !

विद्याप्रतिष्ठान बारामती येथे संशोधन कार्यशाळेसाठी जाताना सोबतचे क्षण.

सरांच्या काम करण्याच्या गतीची तुलना विभागात कोणीही करू शकणार नाही असे मला वाटते. सर अध्यापन खूप उत्कृष्ठ करतात. आदर्श शिक्षक कसा असावा याचे मार्गदर्शन सरांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या वागण्यातून आणि गुणांमधून केले. ते आम्ही टिपले आहे. अध्यापणेतर अनेक गोष्टी सरांनी मला शिकवल्या आहेत.  काही सॉफ्टवेअर सरांनी मला स्वतः शिकवली आहेत, तेही शेजारी बसून ! केवढी ही जिद्द आपल्या विद्यार्थ्याला अमुकतमुक यायलाच पाहिजे याची. सरांचे सेमिनार आणि वर्कशॉप्स असले की सर त्यांच्याबरोबर मला घेऊन जायचे. सेमिनार, वर्कशॉप्स कसे असतात? त्यांची प्रक्रिया कशी असते? त्या क्षेत्रातील मोठमोठ्या आसामी आणि व्यक्तींची ओळख कशी होईल आणि त्यांचेही सद्गुण कसे घेता येतील? या उद्देशाने सर मला सोबत नेत असत. सरांनी त्यांचा कॅमेरा कसा चालवायचा हे शिकवले. योग्य फोटो कसे काढायचे, कोणती फंक्शन्स वापरायची याचे ज्ञान दिले. मोजता न येणारे असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये सरांनी मार्गदर्शन आणि ज्ञानदान केलेले आहे. अश्या प्रकारचे अष्टपैलू ज्ञान सरांनी दिले आहे त्यामुळेच एका शिष्यरुपी ओबड धोबड आकाराच्या दगडाचे रूपांतर गुणांच्या मूर्तीत करण्याचे सामर्थ्य सरांच्या मध्ये आहे असे मी मानतो.

आमची बॅच एम.एस.सी. भाग २ च्या विद्यार्थ्यांसमवेत (२०१८)

समाजात वावरताना कसे वागले पाहिजे? कसे आणि किती बोलले पाहिजे? हे शिकवले. लहानमोठ्या लोकांचा आदर ठेवावा, कोणाला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ नये, दडपण आणू नये, नेहमी सत्यच वागावे अशी शिकवण सरांनी कायम दिली. आयुष्यात शिस्त, प्रामाणिकपणा, नियोजन आणि उत्कृष्ठपणा असायला हवा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. सरांनी लेखन कला शिकवली. चुका शोधण्यास आणि सुधारण्यास शिकवले. वेळोवेळी संधी दिल्या. संधीमधूनच तुम्ही स्वतला सिद्ध करू शकता अशी त्यांची धारणा आहे.

आयुष्य मनसोक्त आणि आपल्या तत्वांनी जगायचे असते. संघर्षामध्ये प्रामाणिक आणि सच्चे प्रयत्न करावेत हे शिकवले. कितीही ताण असेल तरी सर मनमोकळेपणाने हसतात. विभागात सरांच्या सारखे खळखळून कोणीही हसू शकत नाही. ही हास्यलहर विभागातून दौडत जाते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. सरांच्या उपस्थितीची जाणीव करून देते. सर तुम्ही गुरु म्हणून आमच्या आयुष्यात कायमस्वरूपी अढळपणे स्थिर आहात. तुमचे मार्गदर्शन भविष्यातही आम्हाला उपयुक्त राहील. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवशी आम्ही तुमचा आदर करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करतो. गुरूंचे सानिध्य कोणालाच चुकलेले नाही अगदी ईश्र्वरालासुध्छा. इतके मोठे गुरूंचे स्थान भारतीय समाजात आहे आणि आपण या संस्कृतीचे पाईक आहोत याचा अभिमान वाटतो.

सर आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

आपण आनंदी आणि आरोग्यपूर्ण रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

-आपला विद्यार्थी
 अनिकेत दत्तात्रय भोसले
 (रविवार दि. ५ जुलै २०२०)

Sunday, May 17, 2020

प्रा. डॉ. केशव राजपुरे सर (एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !)

यशवंत डॉ. केशव
एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व !

एका मातीचे अनेक रंग असतात
एका विचाराचे अनेक विचार असतात
एका बिंबाची अनेक प्रतिबिंब दिसतात
एका ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी उमटतात
एक एक नसतचं
त्या एका एकात अनेक एक एकवटलेले असतात अंतराळातल्या सूर्यमालेप्रमाणे ! 
तसे आमचे डॉ. केशव राजपूरे सर. *केसू येसू* पासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास. अविरतपणे आपल्या स्वप्नांना स्फूर्तीदायक प्रयत्नांची जोड देऊन आपल्या वडिलांचे यशवंत नाव सत्यात उतरवून जीवनात यशवंत झालेले *यशवंत डॉ.केशव सर*!

          मोठ-मोठी कार्य साधतात ती दृढनिश्चय, असीम धैर्य आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांच्या बळावर ! तिथे परिस्थितीला थारा नसतो, थारा असतो फक्त लढण्याला, जिंकण्याला आणि अव्वलतेला !  विद्यार्थ्याची जिज्ञासा तीव्रतम असेल, बुद्धी अत्यंत कुशाग्र आणि निर्मल असेल तर समाज उभारणीचे कार्य अविरतपणे पार पाडणारे शिक्षकरुपी परीस त्या विद्यार्थ्याचे आणि पर्यायाने समाजाचे सोने केल्याशिवाय स्वस्थ राहत नाहीत हे ध्येय सत्यात आणणारे जिद्दी सर ! विद्यार्थी कसा असावा? तो आदर्शच का असू नये ? तो शिक्षणात आणि आयुष्यात ' टॉप ' च कसा राहील? ही मूल्ये आयुष्यभर रुजवणारे शिस्तप्रिय सर ! 'शिकून काय उपयोग?' असे म्हणून सरस्वतीची अवहेलना करणाऱ्यांना, परिस्थितीपुढे नाक घासनाऱ्यांना आणि माघार घेण्याची सवय असलेल्यांना शिक्षणरूपी यश काय असते याचे झणझणीत अंजन 'याची देही, याची डोळा' घालणारे मुत्सद्दी सर ! शारीरिक आणि मानसिक वेदनांना ठेचत आणि चुचकारत स्वाभिमान ज्वलंत ठेवून आई - वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे यश खेचून आणणारे आदर्श पुत्र ! आयुष्याच्या यज्ञात आणि यशाच्या मार्गावर साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे मित्र! एक उत्कृष्ठ आणि संयमी शिक्षक,  आपुलकी आणि जिव्हाळा असलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व,  सामाजिक भान असलेले एक सुजाण नागरिक!  समाज आणि कार्य या दोन गोष्टी प्रेरणेवर चालतात. प्रेरणा असेल तर अशक्यप्राय गोष्टी शक्य करता येऊ शकतात. आपल्याच मार्गाने येणाऱ्या आपल्याच बांधवांना स्फुरण देऊन  उत्स्फूर्तपणे यश मिळवण्यासाठी तयार करणारी आणि प्रोत्साहन देणारी प्रेरणा म्हणजेच प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे सर!

          'बावधनच्या मातीत वेगळीच चमक आणि धमक आहे..!' या वाक्याला सप्रमाण सिध्द करून दाखवणारे एक जिद्दी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय  राजपुरे सर ! सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत; अनपटवाडी येथे मातोश्री अंजूबाई यांचे पोटी दि. २४ जुलै १९७१ रोजी  झाला. मूळचे दरेवाडीचे (बावधनचीच दुसरी एक वाडी) असणारे राजपुरे कुटुंबीय अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चरितार्थासाठी अनपटवाडी येथे शेतातील वस्तीवर  स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, अशिक्षित आई - वडील, शेती हाच उपजीविकेचा आधार, अन्य उत्पन्नाचे साधन नव्हते तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब सरांच्या मेहनतीमुळे पुढे  यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, हे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांना नेहमी असे वाटे की माझी मुले शिकून खूप मोठी व्हावीत आणि त्यांनी यशस्वी आयुष्य जगावं. कोणत्या पालकांना असे वाटत नाही परंतु परिस्थितीने तर साथ द्यावयास हवी ?  त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करून व्यतीत केले. प्रतिकूलतेमध्ये रूजनारे 'बी' च पुढे जाऊन वटवृक्ष बनत असते !

          अश्या परिस्थितीत अनेक प्रसंगांना सामोरे जात सरांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. सन १९७७ ते १९८० या  काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळ गावी झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेते वेळी मुलाचे नाव काय म्हणून वडीलांना विचारले असता त्यांनी 'केसू येसू राजपुरे' असे नाव लावण्यास सांगितले कारण सरांच्या आजोबांचे नाव केसू असे होते, त्यांवरील प्रेम म्हणून सरांचे केसू हे नाव अजूनही खूप ठिकाणी आपणास पहावयास मिळते. हा नावाचा किस्सा अजूनही सरांना आठवतो. पुढील आयुष्यात नावातील या गडबडीमुळे सरांना पासपोर्ट वेळेवर मिळाला नाही आणि परदेशी जायची संधी गेली.  इयत्ता पहिलीत प्रवेशित झाल्यानंतर वर्गाचा पट होता नऊ, सहा मुली आणि तीन मुले! सर, हनुमंत मांढरे, संदीप यादव, जया, प्रमिला, संगीता, सुनीता, वनिता आणि शारदा. ग्रामीण मित्रमंडळींच्या सोबत हसत खेळत आणि गावगुंडी अनुभवत सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर कायम ८५ टक्के च्या वरच असत. इयत्ता पहिली ते तिसरी या काळात सरांना कोदे गुरुजी हे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे सरांच्या आयुष्यात पूर्वीपासूनच शिस्तीला महत्व आहे. या काळातील दोन किस्से सांगावेसे वाटतात; एक म्हणजे लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सर इयत्ता पहिली मध्ये दोन वेळा बसले होते याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच भक्कमपणे झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र हनुमंत मांढरे आणि सर यांनी केलेल्या दंग्यामुळे कोदे गुरुजींनी केलेली तीन तासांची ओणव्यातून पायाचे अंगठे धरण्याची शिक्षा ! सरांचा खोडकर आणि कुशाग्र स्वभाव अश्या गोष्टींनी फुलत गेला.  सरांचा अभ्यासाचा आवाका आणि कुतूहल वाढण्यामागे हेच कारण असावे. बालपणी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःचे एक विश्व असते. सरांचे ही होते ! सरांना नेहमी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटे. प्रश्न विचारून शिकायचं हे तेव्हाच त्यांना ठावूक होतं. त्यामध्ये ते सतत विचार करत की, हे असे का?, तसे का?, असे का नाही?, तसे का नाही? या सवयीमुळे प्रश्न पडायची सवय आपोआपच लागत गेली आणि उत्तरे मिळवण्याची सुध्दा !

           सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. इयत्ता चौथी च्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. हे गुण सरांच्या अपेक्षेस उतरले नाहीत त्यामुळे त्यांनी निराश न होता अधिकाधिक मेहनत घ्यायचे ठरवले. नंतर १९८१ साली सरांना बावधन हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवी साठी प्रवेश घेण्यात आला.  या वातावरणात विविध स्पर्धा खेळून चुरस, चढाओढ आणि अव्वल राहण्याचे गुण सरांमध्ये वाढत गेले की जे अजूनही त्यांच्यात आहेत. खो - खो सारख्या मैदानी खेळांमध्ये सरांना विशेष आवड होती. या खेळामध्ये सरांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते आणि खो - खो चे अनेक सामने जिंकले होते. सन १९८२ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. हा कालखंड खऱ्या अर्थाने त्यांच्या जडणघडणीचा होता. त्यांचे जीवन यशस्वी करण्यामागे या कालखंडातील काही प्रसंगांचे अनमोल योगदान आहे.  माणसाच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग त्याला काहीतरी प्रेरणा देऊन जात असतो. त्यापैकी च एक प्रसंग म्हणजे इयत्ता पाचवीत असताना सरांना इंग्रजीच्या पेपरमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. सरांचा पेपर अतिशय अव्वल होता. त्यामुळे इंग्रजीच्या शिक्षिका पाटील बाई यांनी तो पेपर इतर मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण हायस्कुल मधील मुलांना दाखवला होता. हा प्रसंग सरांना त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आणि चैतन्यदायी आहे याची जाणीव निर्माण करून गेला. आपण जरी वाडीमधून आलो असलो तरी बावधन मधील हुशार मुलांच्या पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सरांच्यात निर्माण झाला.  सर आजही पाटील बाईंचे ऋणी आहेत. तसेच गणित विषयाचे कै मारुती (एमएस) पवार सर यांचाही सरांवर फार प्रभाव आहे. पवार सरांची एक सवय होती. ते वर्गावर तास घेण्यासाठी आले असता दारातून येतानाच गणित सांगत येत असत आणि मुलांना सोडवायला सांगत असत. एके दिवशी पवार सर एक गणित सांगत वर्गात आले आणि गणित सांगून संपल्या बरोबरच पुढे बसलेल्या केशवनी लगोलग उत्तर दिले. उत्तर बरोबर होते. सरांनी विचारले कसे आले ते सांग. पण केशवना अचानक पद्धत सांगता आली नाही, ते घाबरले आणि पवार सरांनी त्यांना एक तास बाकावर उभे राहायची शिक्षा केली. या प्रसंगातून सरांना आपल्या आयुष्यात आत्मविश्वास किती गरजेचा आहे याचे महत्त्व समजले. पवार सरांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सरांना शिस्त आणि आत्मविश्वास देऊन गेला. 

त्यानंतर सरांनी अभ्यासात कधीही मागे वळून पाहिले नाही. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्क्यांच्या खाली कधीही आले नाहीत. ही विशेष बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते. सरांचे आवडते दुसरे पवार सर म्हणजे; पीएन पवार सर! सरांच्या मार्गदर्शनाखाली केशव सर संघात असलेल्या बावधन संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाला संघांना धूळ चारली ती निव्वळ पवार सरांनी पेरलेल्या जिद्दी खेळाने. सर इयत्ता सातवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांच्या खो - खो संघाचे कप्तान होते, स्काऊट गाईड चे कॅम्प असो, क्रीडा स्पर्धा असो सरांनी आघाडी कधीच सोडली नाही. 'विद्यार्थी हा विद्येचा भुकेला असला पाहिजे, तो परीक्षार्थी असता कामा नये'- ही सरांची कायम धारणा !

          आयुष्यात सारं जिथल्या तिथं आणि सहजरित्या मिळालं तर आयुष्याला अर्थ राहत नाही. प्रतिकुलतेवर मात करून मिळवलेलं यशच जगण्याला आनंद देत असतं. सरांच्या बाबतीत सुध्दा असेच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण प्रवास चालू ठेवला. दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास केला. मित्रांची जुनी पुस्तकं तसेच बायडींग केलेल्या वह्या वापराव्या लागल्या.   वर्षाकाठी केवळ एकच गणवेष सरांना मिळत असे. हे सर्व दुःख सरांच्या वाट्याला आलेलं होत. काही प्रसंग डोळ्यांमध्ये पाणी आणणारे होते तर काही प्रसंग मन पिळवटून टाकणारे! असाच एक प्रसंग: अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असणाऱ्या बी. टी.पिसाळ या पी. टी. च्या सरांकडून त्यांना शिक्षा मिळाली. एके दिवशी बी. टी. पिसाळ सर मैदानावर मास ड्रिल चा सराव घेत होते. त्या वेळी सर्वात पुढे टेबलवर उभे असलेल्या  केशव सरांनी पाठीमागे पँट फाटल्यामुळे  इन शर्ट केला नव्हता. त्यामुळे पिसाळ सरांनी त्यांना शिक्षा केली होती. नंतर जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हापासून कधीही त्यांनी सरांना इन शर्ट का केला नाहीस असे विचारले नाही. दुसऱ्या दिवशी पिसाळ सरांनी त्यांना पँट आणून दिली.  स्वभावाने शांत आणि लाजाळू असणाऱ्या सरांना परिस्थितीचे चटके जाणवत होते पण पर्याय नव्हता. जे होतं त्यातच समाधान मानावं लागत होतं. सगळ्या गोष्टींवर मात करत सर प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत होते. 

बावधन जनता सहाय्यक मंडळ दरवर्षी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बावधन बगाडाच्या वेळी बक्षीसे देत असत. सरांनी पाचवी ते दहावी दरम्यान सलग सहाही वर्षी ही बक्षिसे मिळवली आहेत. त्याकाळी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांना 'पेड की गवाही' या नाटकामध्ये एका वकिलाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी करून दाखवली. हे असतं लढत राहणं!  हे असतं जीवनाचा खरा आनंद घेणं!  इयत्ता दहावीच्या वर्गात असताना सरांची खरी प्रतिभा प्रकटली. ते त्यांचा सर्व अभ्यास दिवसाच करत असत कारण रात्री घरात लाईट नसायची. दिवसभर शेतात काम करत त्यांनी दहावीचा अभ्यास खूप मेहनतीने पूर्ण केला. परिणामतः जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यांच्यामुळे सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्र आणि पंचक्रोशीत प्रथम आले. मूळ गावी दरेवाडीतील ग्रामस्थांनी ढोल वाजवत आणि गुलाल उधळत सरांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. ही शाबासकीची थाप सर कधीही विसरू शकत नाहीत. साधारण दिसणाऱ्या असाधारण विद्यार्थ्याचे यश होते ते ! कष्टकरी घरे सुध्दा असे बुद्धिवंत समाजास देत असतात याचीच ही प्रचिती नव्हे का ? 

          दहावीच्या निरोप समारंभामध्ये इच्छा असताना सरांना रंगीत ड्रेस घालायला मिळाला नाही. सगळे मित्र रंगीत ड्रेस घालून आले होते. सरांकडे वर्षाकाठी मिळणारा एकच पांढरा शर्ट आणि खाकी पँट असणारा ड्रेस होता. ते तोच गणवेष घालून समारंभात आले होते. कठीण परिस्थितीत तोच त्यांचा मित्र होता! आजही जेव्हा आपण सरांचे विद्यार्थी दशेतील फोटो पाहतो तेव्हा मनामध्ये माणसाची परिस्थिती आणि त्याची बुद्धिमत्ता यांचे चाललेले द्वंद्व थैमान घालते. वार्षिक यात्रेनिमित्त वर्षातून एकदाच सरांना, त्यांच्या बहिणींना आणि आईला त्यांच्या आजोळी म्हसवे, येथे जायला मिळत असे. परंतु पैश्यांची कमतरता असल्यामुळे ही सारी मंडळी पहाटेच घरातून निघून मजल दर मजल करत रानातून, डोंगरातून आणि खिंडीतून  पाऊलवाटेने तब्बल १५ कि.मी. चालत जात असत आणि परत तेवढंच अंतर कापून माघारी अनपटवाडी ला घरी येत असत. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सर आणि त्यांचे वडील वाईला साहित्य आणण्यासाठी ८ कि.मी. चालत जात असत आणि रात्री परत माघारी येत असत. 

माणसाला आयुष्यात दोन गोष्टी महान बनवत असतात; एक म्हणजे त्याने सोसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम ! मोठ्या कष्टांनी दहावी ला खूप गुण मिळाले होते. आता कॉलेज ला प्रवेश घ्यावा लागेल पण त्यासाठी पैसे आणि गणवेष पाहिजेत. कॉलेजला जायचे असेल तर जुना गणवेष घालून जायला कमीपणाचे वाटे. म्हणून एकदा सरांनी आईला नवीन रंगीत ड्रेस घेण्यासाठी विचारले असता पाच भावंडांच्या देखभालीमध्ये गुंतलेल्या आणि संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईने असमर्थता दाखवली. ही असमर्थता सरांना कित्येक वेळा कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. त्याच क्षणी सरांनी ठरवले की आपणही वडिलांबरोबर मजुरी करायची कॉलेज साठी आपला ड्रेस आपण घ्यायचा. भर उन्हात, अनवाणी पायांनी सरांनी विहिरीतून दगडाच्या पाट्या बाहेर काढण्याचे काम स्वीकारले. सरांनी त्या वयात पोटात गोळा येईल एवढे काम केले. विहिरीच्या तळामध्ये काम करणारे वडील आपल्या मुलाचं काम पाहायला आले आणि त्यांना पाहून सरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. वडिलांनी त्यांना कवटाळले आणि त्या क्षणी सरांना वडील आणि कष्ट या जोडीचे दाहक सत्य उमगले. सरांनी त्या वेळी तीस रुपये हजेरीने सहा दिवस काम केले. त्यातून त्यांना एकशे ऐंशी रुपये मिळाले. आपल्या आयुष्यातील पहिला रंगीत ड्रेस सरांनी  स्वकमाईतून घेतला. जीवनाच्या प्रवासात येणारे असे आसू आणि हसू चे प्रसंग माणसाला मानसिक बल देत असतात !

          उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी काम करून पैसे कमवायचे या द्विधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी या काळात सरांना आधार दिला. त्यांचे कापड व्यवसायाचे दुकान होते. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु दाजींच्या ओळखीच्या शिक्षकांनी सांगितले की एवढे उत्तम गुण मिळून सुध्दा कॉलेज ला प्रवेश का घेतला आहे, तुम्ही डिप्लोमा साठी प्रयत्न करावा. तद्नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. दहावीचे गुण आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डिप्लोमा करण्यासाठी मानसिक तयारी केली. त्यानंतर वसतिगृहात सरांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. नियतीच्या मनात नक्की काय असते मनुष्याला कधी समजले आहे का ? दाजींचा रोष ओढवून, वेळ न दवडता वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. सर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणांनुसार  अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विसावे होते. सरांना कॉलेज साठी लागणारे साहित्य, पास आणि इतर सुविधांची पूर्तता वडिलांनी मजुरी करून  केली. महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सर सांगायला विसरत नाहीत. विज्ञान विभागाची जर्नल्स घेण्यासाठी सरांना पैशाची आवश्यकता होती. त्यांनी वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी गावातील संपतराव गोळे यांचेकडून उसने पैसे घेऊन सरांना दिले. सर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले, त्यांनी पैसे कंपासबॉक्स मध्ये ठेवले होते. प्रॅक्टिकल वेळी त्यांचे पैसे कोणीतरी चोरले. गरीबीमध्ये प्रामाणिक असणाऱ्या माणसावर नियतीने नकळत केलेले वार फार जिव्हारी लागतात ! घरी आल्यावर झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील म्हणाले, "असुदे, तुला मी परत पैसे देईन !" त्यानंतर वडिलांनी आणखी काही दिवस मजुरी करून आलेले पैसे जर्नल घेण्यासाठी सरांना दिले. असा प्रत्येक प्रसंग काही ना काही ज्ञान देऊन जात होता, सरांना जाणतं करत होता !

          नवीनता, कष्टाळू वृत्ती, सोशिकता, प्रामाणिकपणा आणि रोज नवनवीन शिकण्याची भूक असणारा हा विद्यार्थी कॉलेजमध्ये सुध्दा चमकत होता. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२  टक्के गुण  मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला. सरांची विशेषता म्हणजे त्यांनी दहावी आणि बारावी साठी एकही शिकवणी लावली नव्हती. केवळ प्रतिभा आणि आंतरिक इच्छेच्या बळावर सरांनी एवढे मोठे यश मिळवले होते. बारावी झाल्यानंतर शिक्षण आणि कामधंदा यांचा नाच सरांच्या डोळ्यांपुढे थैमान घालत होता. सरांचे मोठे बंधू सुध्दा शिक्षित होते. त्यांनी एम. कॉम. पूर्ण केले होते आणि त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. नोकरी सहजासहजी मिळतं नसल्याने घरखर्च वडिलांनाच भागवावा लागत होता आणि हीच गोष्ट सरांना सारखी बोचत होती. परंतु पर्याय नव्हता. सर बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. सगळीकडे त्यांचे कौतुक आणि सत्कार होत होते. या सगळ्या धावपळीत सरांनी परत खंडाळ्याच्या दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने  त्यांच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. सरांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय माणसातील दाजीरूपी देवाने घेतल्यानेच पुढील शिक्षण सोपस्कर झाले.  

          सन १९८९ साली नातेवाईकांनी दाजींना विनंती केल्यामुळे लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी. एससी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते.  बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी घेतली. सरांच्या ठायी असणारी चमक आणि हुशारी महानवर सरांनी ओळखली होती. त्याचबरोबर सरांच्या परिस्थितीची सुध्दा माहिती त्यांना झाली होती. महानवर सरांनी प्रवेशावेळी दाजींना सांगितले होते की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवा मी त्याला शैक्षणिक मार्गदर्शन करतो, असे आश्वासन महानवर सरांनी दिले. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. दाजींचा भक्कम आधार मिळाला. महानवर सरांना त्यांच्या महाविद्यालयाचा हिरा सापडला ! त्याला पैलू पाडण्याचे काम चालू झाले. 

सरांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर सरांनी स्वतःचा दिनक्रम बनवला होता. ते भल्या पहाटे उठत असत. स्वतः सर्व कामे आवरून सकाळच्या पावणेसहाच्या बस ने लोणंद ला जात. तिथून एक किलोमीटर चालत महाविद्यालयात जात असत. नित्यनेमाने सर्व लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स करत असत. बऱ्याचदा डबा नसल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशीच असत. सकाळी घरातून निघताना रात्री शिल्लक राहिलेले अन्न खावून सर कॉलेजला निघत असत. कृतज्ञतेची भावना असलेल्या मनाला दुसऱ्यांना त्रास देण्यास अजिबात आवडत नसावं ! महानवर सर स्वतः प्राचार्य असूनही नेहमी सरांची जातीनिशी चौकशी करत असत. सरांना लागणारे प्रश्नसंच, पुस्तके, नोट्स ते मागण्या अगोदरच मिळत असे. एक पालक आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशी जबाबदारी महानवर सरांनी घेतली होती. त्याचबरोबर दाजींनी सुद्धा सरांना आपला एक मुलगाच समजून सांभाळ केला. कॉलेज मध्ये सरांच्या अभ्यासाची चौकशी वारंवार होत असे. त्यांना नेहमी विशेष व्यक्ती प्रमाणे वागणूक मिळत असे. शेवटी म्हणतात ना हिऱ्याची ओळख रत्नपारख्यालाच असते !  

हे करत असतानाच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, महानवर सरांच्या जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही प्रकारे हाती घेतलेले कार्य पूर्ण करून घेण्याच्या तळमळीतून आणि गुरूजनांना त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणाऱ्या सरांच्या बेजोड कष्टांमधून 'न भूतो, ना भविष्यती' असे यश महाविद्यालयाने मिळवले होते. सन १९९२ साली बी. एससी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी बाजी मारली होती. लोणंदच्या विनाअनुदानित महाविद्यालयाचा विद्यार्थी भरमसाठ गुण मिळवून संपूर्ण शिवाजी विद्यापीठात प्रथम येतो याचे किती तरी जणांना नवल वाटले ! योगायोगाची गोष्ट म्हणजे सर बी. एससी. मध्ये विद्यापीठात प्रथम आले आणि त्याच वर्षी महाविद्यालयास पूर्ण अनुदान मिळाले. महानवर सरांच्या कष्टाचे चीज झाले होते. हाडाचे शिक्षक कसे असतात याचे उदाहरण म्हणजे महानवर सर! महानवर सरांच्या ठाई असलेले पद्धतशीरपणा, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण सरांनी अवलोकले. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली. सरांच्या पंखांना बळ देण्याचे काम येथेच झाले. 'केशव आपल्याला एम. एससी. करायची आहे !', हे महानवर सरांचे बोल अजूनही सरांना आठवतात.  परीस ज्याला स्पर्श करेल त्याला सुवर्णमय करतो. सरांच्या आयुष्यात आलेले महानवर सर हे त्यांच्यासाठी आदर्श परीसच होते. एक हक्काचे आधारवड होते.

          खेड्यातील गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या एका मुलाने आपल्या कुशलतेने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव व्हावा असे महानवर सरांना नेहमी वाटे; विशेषतः हा गौरव तत्कालीन मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा होती. त्यांची बदली रामानंदनगर येथे झाली असतानाही त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री आणि आमदार कै.पतंगराव कदम यांच्या हस्ते सरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. उद्देश एकच, आपण घडवलेला मुलगा जीवनात यश तर मिळवणारच आहे पण त्याला आणि त्याच्या सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणा मिळायला हवी! खरच अशा शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे. महानवर सरांनी एवढ्यावरच न थांबता सरांच्या गावी अनपटवाडी येथे सरपंच आणि पंचायतीच्या सदस्यांना कॉलेज चे पत्र पाठवून केशव सरांचा आमदार मदनराव पिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यास सांगितले होते. त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली होती. ते पत्र अजूनही सरांच्या संग्रही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तयार झालेले हे मैत्रीचे आणि स्नेहाचे नाते आजीवन टिकले आहे.

          सन १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम.एससी. करायचे ठरवले. त्यांनी याकरता शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रवेश अर्ज केला. बी. एससी. मध्ये विद्यापीठामध्ये प्रथम आल्यामुळे सरांना एम.एससी. साठी प्रथम क्रमांकाचा प्रवेश मिळाला. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झाले. सर विद्यापीठात आल्यावरही महानवर सरांचे त्यांच्यावरील आणि अभ्यासावरील लक्ष कमी झाले नव्हते. पत्राद्वारे कायम मार्गदर्शन आणि चौकशी ठरलेली असायची. दाजीही अभ्यासासाठी किमान आवश्यक खर्च म्हणून दरमहा पाचशे रुपये पाठवत असत.  या शिक्षण कालखंडात सरांच्या जीवनात अत्यंत गरजेची स्थित्यंतरे आली. एम.एससी. दरम्यान सर विद्यापीठ वसतिगृहात राहत असत. प्रथम वर्षी त्यांना इंग्रजीचे डॉ. विवेकानंद रणखांबे हे मित्र लाभले. दोघेही वसतिगृहाच्या खोलीत एकत्र राहत असत. विवेकानंद रणखांबे यांचा स्वभाव अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होता. वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारा आदर, नम्रता, सुशील स्वभाव आणि शांत वृत्ती हे गुण केशव सरांनी त्यांच्याकडून आत्मसात केले. नातेसंबंध जपण्याची कला सरांना याच मित्राकडून शिकायला मिळाली. द्वितीय वर्षात असताना त्यांचे लोणंद येथील गणिताचे जुनिअर मित्र श्री. अरविंद तावरे हे रूम पार्टनर म्हणून लाभले. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परिपूर्णता तसेच सभ्य वर्तन या सर्वांचा प्रभाव सरांवर होत होता. माणसाला आयुष्यात भेटलेली माणसेच घडवत असतात, खोल परिणाम करत असतात हेच खरं!

          एम.एससी. च्या परीक्षेत सन १९९४ साली सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. जिद्द, चिकाटी आणि चौकस बुध्दीने ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. एम.एससी. झाल्यानंतर काही काळ सर गावी राहिले. सरांना नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. विद्यापीठामधील प्रपाठक प्रा. ए. व्ही. राव सर वारंवार पत्र पाठवून सरांना संशोधनासाठी येण्यास आग्रह करत असत. त्यानुसार संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए. व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. प्रताप वाघ सरांच्या सहकार्यातून प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. त्यांना दरमहा अठराशे रुपये एवढे मानधन मिळत असे. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत. दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ साली सरांच्या वडिलांचे निधन झाले. सर त्यांच्या सेवेत कायम व्हावेत आणि लवकर स्थावर व्हावेत अशी वडिलांची नेहमी इच्छा होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याची इच्छा वडिलांनी सरांकडे बोलून दाखविली होती, ती सुद्धा अपुरी राहिली. आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन सुध्दा सरांना करता आले नाही. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. सरांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज होती. अशा वेळी त्यांचे मित्र डॉ. प्रताप वाघ यांनी आलेल्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरांना धीर दिला. वर्षभर त्यांचा आर्थिक बोजाही वाघ सरांनी उचलला. मनमिळावूपणा, पडेल ते कष्ट करण्याची तयारी, सुस्वभाव हे वाघ सरांचे गुण त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आचरणात सुध्दा आणले. आयुष्य नेहमी माणसासाठी ज्ञानदानाचं कार्य करत असतं, माणसानं मात्र विद्यार्थी होऊन ते अवगत केलं पाहिजे!

          सरांना आता नोकरीची नितांत गरज भासू लागली होती. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले (प्रपाठक, भौतिकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम स्टोरेज घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. संशोधन करत असताना भोसले सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल परिणाम सरांवर झाला. त्यांचे अनेक गुरुमंत्र सरांना शिकायला मिळाले. ज्ञानाबरोबरच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात पाहिजे ते ध्येय साकार करू शकता आणि कठीण पेचप्रसंगामध्ये मार्ग काढू शकता अशी शिकवण भोसले सरांकडून मिळाली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे सरांकडून मिळाले.  भोसले सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची हातोटी आत्मसात करता आली. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून १९५० रुपये मानधनावर दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून ३२५० रुपये मानधनावर एक वर्ष संशोधन कार्य केले आणि त्यानंतर त्यांचा उज्वल भविष्यकाळ त्यांना समोर दिसू लागला! प्रचंड कष्ट आणि जीव ओतून केलेल्या संशोधनामुळे जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. सर्व पराकाष्टांचे फळ मिळाले! सर या पदावर राहून अध्यापनाचे कार्य अत्यंत तळमळीने आणि मन लावून करत असत. कितीही संकटे आली तरी, त्रास झाला तरीही प्रयत्न न सोडता त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरच यश प्राप्त होते अशी सरांच्या कार्य करण्याची शैली होती.

          गत जीवनात लाभलेले प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, महानवर सर आणि डॉ. भोसले सर या सर्वांच्या ज्ञानाचा, आत्मविश्वासाचा आणि मेहनतीचा परिपाक म्हणजे सरांचे एम.एससी. च्या वर्गांना होत असलेले दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन! १९९९ सालापासून ते आज तागायात सरांचे अध्यापन लाभलेला एकही विद्यार्थी असा सापडणार नाही की ज्याची अध्ययनाची भूक भागली नसेल. आजही विद्यार्थी सरांच्या शिकवण्याच्या पद्धतींची, विवेचनाची आणि मिळालेल्या ज्ञानाची आठवण काढत असतात. सरांचे क्लासिकल मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्स चे लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. शिकवताना सर अगदी निष्ठेने आणि देहभान विसरून शिकवितात आणि मुले मुग्ध होऊन जातात. मुलांच्यात आत्मविश्वास वाढावा, विषयज्ञान वाढावे यासाठी विभागात सेमिनार चे आयोजन होत असते. तिथे प्रश्नोत्तराचा तास चालतो. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांची त्रेधातिरपीट उडते. उद्देश हाच की, मुलांनी सखोल अभ्यास करावा, वरवर किंवा परीक्षेसाठी अभ्यास नको! निश्चयी स्वभाव, विषयाचे सखोल ज्ञान, समजून सांगण्याची कला, रंजकता, चिकित्सक वृत्ती, विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, अवधान खेचक क्षमता, बुद्धीचातुर्य, कमालीची कल्पकता आणि नवनिर्माण क्षमता, प्रसंगी विनोदी वृत्ती आणि कठोरता या साऱ्यांनी बनलेले आदर्श प्राध्यापक म्हणजे राजपुरे सर! भौतिकशास्त्र कसे शिकवावे याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सरांची लेक्चर्स. मुलांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत, रेडिमेड नोट्स वापरण्याची सवय सरांना अमान्य आहे, सतत सराव केला पाहिजे, अव्वल राहिले पाहिजे, कितीही त्रास झाला तरी विद्यार्थ्यांनी यशाचा शॉर्टकट शोधू नये अशी परखड मते सरांची आहेत. विद्यार्थी विद्या मिळवण्याच्या हेतूने आलेले असतात त्यांना तुम्ही परीक्षार्थी बनवू नका, त्यांना रोबोट्स, कारकून, पंगू बनवू नका, स्पून फिडिंग करू नका, त्यांच्यात तुम्ही स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढवा या मंत्राचे बाळकडू शिक्षक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर नेहमीच देत असतात. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब !' या काव्यपंक्तीनुसार विद्यार्थ्यांना काम सांगितल्यानंतर ठराविक वेळेनंतर सर कामाचा पाठपुरावा करतात, ते काम गुणवत्तापूर्वक पद्धतीने करून घेतात. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी त्रस्त होतात पण यामुळे  विद्यार्थ्यांना त्वरीत अचूकपणे कामे करण्याची सवय लागते. ही पद्धत सरांची कार्यशैली रेखांकित करते!

          सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सी.एच.भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सप्टेंबर २००० मध्ये ऑस्ट्रियातील मायकल न्यूमन स्पेलार्ट या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाने सरांना पुढील संशोधनासाठी फ्रान्सला निमंत्रित केले होते. पण पासपोर्ट वेळेवर न मिळाल्याने सरांना ही सुवर्ण संधीच सोनं करता आल नाही. कदाचित याच भूमीची सेवा सरांच्या हातून घडणार होती ! पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट परीक्षा सर पास झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. भौतिकशास्त्रातून सेट पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जीचा निकाल तेव्हा १ टक्क्यांहून कमी लागत असे. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यातील अनुभवाने आलेल्या प्रतिभेमुळे व त्यांच्यात निर्माण झालेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभावामुळे ! 

          परिस्थितीला नमवत जिद्दीने अध्यापनात आणि संशोधनात कार्य करणाऱ्या सरांच्या व्यक्तित्वाची छाप विद्यापीठ प्रशासनावर पडली होती. त्याचाच परिपाक म्हणजे केवळ गुणवत्तेच्या जोरावर सर २०११ साली भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. गत दशकापासून अध्यापन आणि संशोधनाचे कार्य अत्यंत तळमळीने केले असल्यामुळे २०१४ साली सरांची सरळ सेवा भरतीद्वारे प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. सध्या सर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र विषयात सर्वात अव्वल अशा प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. सरांची शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय अशी ख्याती आहे. 


          महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा'  संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. सोलर सेल्स, थिन फिल्म्स, फोटोकॅटॅलीसीस ऑफ वॉटर हे सरांच्या संशोधनाचे विषय आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सदरील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुढे दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदी काम करत आहेत. सरांनी केंद्र सरकारच्या निधीतील पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती करून विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधेमध्ये भर घालून सुसूत्रता आणली आहे. स्वतः बरोबरच इतरांचा सुध्दा विकास करण्यात असलेली  सरांची आवड त्यांच्या अविरत कार्यातून प्रतीत होते.

          विद्यापीठाचे 'गोल्ड मेडलिस्ट' राहिलेले सर सध्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधनातून शिवाजी विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यात मोठे प्रयत्न करताना दिसून येतात. सरांचा संशोधनातील एच. इंडेक्स ५० आहे. तर सरांच्या संशोधनास ७१७४ सायटेशन्स मिळाली आहेत. यावरून सरांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता जाणकारांच्या सहज लक्षात येईल. त्यांचे कर्तृत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि एसएआयएफ या केंद्रीय सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून चार वर्षांची मातृसंस्थेची सेवा झाली. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या लोकल इन्कवायरी कमिटी (एल.आय.सी.) तसेच टेक्निकल कमिटी अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे. एवढा प्रचंड कामाचा पसारा सांभाळत असताना सरांना याचे गमक विचारले असता सर सांगतात की, " तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, शिस्तबद्धपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सुद्धा मोठमोठी कामे करू शकता. कोणत्याही कामात उत्कृष्ठपणा आणता आली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळाले पाहिजे !"

          अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. सामाजिक आपुलकी आणि जिव्हाळा जपत ते समाजासाठी उपयोगी कार्ये करत असतात.  मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासासाठी समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. 

          आपल्याला जीवनात आणि समाजकार्यात मिळालेल्या यशात बऱ्याच व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे असे ते मानतात. त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकता आणि नम्रता ही त्याच्या वडिलांची भेट आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे आणि कष्टमय आशीर्वादांचे मोठे योगदान आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, हिय्या दाखविण्याची कला आणि हिंमत न हारण्याचा गुण सरांना आईकडूनच मिळाला. सरांना बी.एससी. दरम्यान आणि त्यांनतर आपल्या मुलापलीकडे माया लावणारी आणि संगोपण करणारी त्यांची बहीण फुलावती (आक्का) म्हणजे त्यांची दुसरी आईच ! त्यांचे वडीलबंधू श्री. बाळासाहेब राजपुरे (दादा) हे उच्च विद्याविभूषित असूनही सुरुवातीपासूनच गावाकडील कुटुंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे सरांना हे सर्व शक्य झाले. आपल्या यशात मोठ्या बंधूंचा मोठा वाटा आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे भाचे राजू शिर्के यांचे त्यांच्याविषयीचे बंधुतुल्य स्नेह आणि सर्व गोष्टींत सहकार्य, पाठिंबा आणि आधार हे ते विसरत नाहीत. सरांना त्यांचे मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, रवींद्र अनपट, अजित पिसाळ, शिवाजी खंडागळे या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि प्रोत्साहन शिक्षणादरम्यान मिळाले. त्यांचे ते शतशः ऋणी आहेत. यशाच्या शिखरावर असताना हुरळून न जाता आपल्या मातीत पाय रोवून नाती जपण्याची कला सरांकडून शिकावी! 

          सर पहिल्यापासूनच 'डिटरमिनिस्टिक' म्हणजे निश्चयी स्वभावाचे असून ते हाती घेतलेले काम गुणवत्तापूर्वकरितीने पूर्ण झाल्याशिवाय हातावेगळे करत नाहीत. त्यांच्या राहण्यात साधेपणा असून त्यांनी 'हाय प्रोफाईल स्कॉलर लाईफ' जगली आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर हवे तसे वागणे सरांना मान्य नाही. माणसाने आपली भूतकाळातील परिस्थिती आठवून जमिनीवरच राहायला हवे आणि आनंदात जीवन जगायला हवे असे त्यांना वाटते. त्यांच्या ठायी असणारा कमालीचा नम्रपणा, हुशारी, शिस्तबद्धपणा, तीव्र इच्छाशक्ती, समर्पणवृत्ती आणि मायाळू स्वभाव त्यांच्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुभवण्यास मिळतो. सरांचा स्वभाव रागीट आणि शीघ्रकोपी जरी असला तरी त्यांचे विद्यार्थी वर्तमानात भेटल्यावर आवर्जून सांगतात की सरांच्या शिस्तीमुळे आज आम्ही यशस्वी जीवन जगत आहोत ! एकवीस वर्षांच्या अध्यापनात सरांनी अनेक यशस्वी आणि परिपूर्ण विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याकडे पाहून त्याचे आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विश्लेषण करण्याची दुर्लभ क्षमता सरांना लाभली आहे. नियमित व्यायाम आणि खेळ यामुळे सर नेहमी निरोगी असतात. एक चैतन्यदायी, उर्जादायी आणि प्रफुल्ल अध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजपुरे सर !  एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मुलांना आणि विद्यापीठास लाभले याबाबत विद्यार्थ्यांमधून नेहमीच प्रतिक्रिया येत असतात.


          सरांना मित्र जोडायचा छंद आहे. लहानपणी पासून ते आजतागायत सरांनी खूप मित्र मिळवले आहेत. फेसबुक, व्हाट्सऍप सारख्या समाजमाध्यमांवर सरांच्या मित्रांची संख्या पाहून कित्येक जणांची बोटे तोंडात जातात! सर मित्रांवर तेवढीच माया आणि प्रेम करतात. एस.एस.सी., एच.एस.सी., बी.एस.सी., आणि एम.एस.सी. चे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आजही सरांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांचे स्नेहमेळावे घेऊन हितगुजाच्या गोष्टी, सुख-दुःख यांची देवाणघेवाण केली जाते. यातही सरांचा पुढाकार असतो. हे काम तोच व्यक्ती करू शकतो ज्याची नाळ गावाशी आणि माणसांशी जोडलेली आहे. या कृतीतून सरांचे मित्रप्रेम किती अफाट आहे याची अनुभूती येते. नेहमीच वेगळ्या पद्धतीने जगायला सरांना आवडते. आपले आयुष्य आपल्या तत्वांनी जगत असताना ते आनंदी होऊन जगायला आवडते. आपले आयुष्य सुंदर करायला आवडते !

          आपल्या गावातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सर सांगतात की, तुम्हाला सुध्दा उच्च ध्येय गाठता येऊ शकेल, तुम्हालाही यशस्वी व्यक्तिमत्व होता येईल. तुम्हाला फक्त एकच करावं लागेल - अगदी जिद्दीनं, प्रामाणिकपणे विद्याग्रहन करावं लागेल. घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनेक वेळा शाळेची फी सुध्दा भरणे शक्य नव्हते, चटणी, भाकरी आणि शिळे अन्न खावून दिवस ढकलले आणि हार न मानता उत्तुंग यश संपादन केले. आपल्या मुलाने शिकून खूप मोठं नाव कमवावे अशी वडिलांची इच्छा सरांनी पूर्ण केली. त्यांच्या प्रवासावरून हे समजते की कोणत्या विद्यार्थ्यांत कोणता स्पार्क असेल हे सांगता येत नाही. असा स्पार्क शोधणे आणि त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षक, शाळा आणि पालकांचे आद्य कर्तव्य आहे. कुठलेही यश मिळवण्याचा मार्ग खडतरच असतो. सर्वस्व ओतून आणि प्रयत्नवादी राहून तसेच घाई, गडबड न करता, त्वरित फळाची अपेक्षा न करता सतत कार्यतत्पर राहून आपणास दिवसागणिक प्रगती करावी लागते असा सरांचा ठाम विश्वास आहे. आयुष्यात कौतुकाबरोबरच थोडी शिस्त पण हवी अशी त्यांची धारणा आहे.  आपण जेव्हा शिक्षकी पेशा स्वीकारतो तेव्हापासूनच आपण कठोर परिश्रमांचा वसा घेतलेला असतो हे डॉ. राजपुरे सर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासामधून आपणास उमगले असेलच! 

          खिडकीतला बोन्साय बनून रहाणं त्यांना कधी जमलेचं नाही. उन्हा -तान्हात तावून सुलाखून ज्याप्रमाणे गुलमोहर बहरतो तसेच जीवनात तावून सुलाखून गुलमोहराप्रमाणे त्यांना बहरायला आवडले आणि ते सत्यात ही उतरवले. ज्याप्रमाणे- धावणाऱ्यांसाठी वाटा नसून वाटांसाठी धावणे असते गरुडझेप घेणारांसाठी आभाळाचे ओझे नसते, तसे सरांनी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ती पायवाट न ठेवता तिचे हमरस्त्यामध्येच रूपांतर केले. त्यांना कधीही कोणत्याही आव्हानांचे ओझे वाटलेचं नाही आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे ओतप्रोत होता. जिद्द पेरली की यश उगवते तसा त्यांचा एका छोट्याशा वाडीतून केसू येसू पासून सुरु झालेला जीवनप्रवास शिवाजी विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील विभागप्रमुख या उच्च स्थानावर पोहोचून यशवंत डॉ. केशव पर्यंत येऊन ठेपलेला आपल्याला पहायला मिळतो.

          सर आपल्या अध्यापनाचा आणि संशोधनाचा आलेख उंचावत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना! आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी सदिच्छा ! सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

शब्दांकन
अनिकेत दत्तात्रय भोसले 
मोबाईल: ८९७५७११०८० 

Friday, May 8, 2020

शिक्षक : एक संस्कारक्षम काटेरी बाभळ !


त्याची सुरुवात झाली ती पावसाळ्यात. काही महिन्यांचा पावसाळा. उष्ण कटिबंधीय पानझडी चे पठार. त्याच्या हृदयाला हाक आली आणि चालू झाला प्रवास. त्याला जात, गोत्र, धर्म, प्रदेश, सीमा, मित्र, आई, बाबा, सोयी, सुविधा, आरक्षण, अनुकंपा, वशिला हे काहीच माहिती नाही त्याला फक्त उगवायची हाक आली आणि मानला त्यानं आदेश त्याच्या तत्वाचा. मातीच्या पोटातून वर पाहिले तेव्हा पाऊस होता. हर्षला, चेकळला, बहरला. असचं असतं आयुष्य नेहमी, असे समजण्याची चूक करायला तो मूर्ख नाही !  

त्याचा पहिला उन्हाळा आला. वीत भर मातीच्या वर,  वीत भर मातीच्या खाली. ना गर्व, प्रतिष्ठा, मान, सन्मान, हेवे-दावे. एकटाच. उन्ह, दख्खन च उन्ह ! रक्तात चिवटपणा, जिद्द,  दोन्हीकडून वर सरण्याची. उष्ण झळया, कोरडी माती, ना पाणी ना गारवा. एकटा रणरणत्या उन्हात. मित्र नाही, कुटुंब नाही, सगे नाही आणि सोयरे नाही. चार दोन जगलेली पानं. या तापट सत्यानं मान जळून वाकली. झुकली, मोडली, माती पुन्हा दिसायला लागली. पण हात तर जिवंत आहेत. जगले, तगले, झगडले, लढले, वाढले. पुन्हा मान उभी केली. पण आनंद नाही आता, आता जबाबदारी. मातीत आणि आकाशात जाण्याची. निर्दयी काळे पाषाण लागले खाली, असंख्य टकरा देऊन पाण्याचा व अन्नाचा कण आणि कण गोळा करून स्वतःमध्ये साठवून ठेवला. 

जसे क्षण, दिवस, ऋतू जाऊ लागले तो मोठा होऊ लागला. हसत, झुलत, रडत, खेळत. जाता कुठे येत नाही. पाय तर खोलात, आंधळे, तत्वांशी प्रामाणिक, बधिर, आकाश न पाहिलेले, स्थिर. वाढत राहिला. मोठा झाला. पाय खोल रोवलेले, पाण्याचा आणि अन्नाचा अंदाज घेणारे मित्रच जणू. अंगावर काटे. तीक्ष्ण, टोकदार, असंख्य, कडू. पानांचा आकार लहान, बारीक-सारीक, काटकसर करणारा. अंगावर जीर्ण झालेली पण कोणत्याही वाईट वादळात साथ देणारी काटेरी आणि जाड साल. रक्षक, विश्वासू, स्वओळख. नभात शिरलेले असंख्य हात. पसरलेले, उन्हाचे दान घेण्यासाठी. पक्षी आले. खूप, वेगवेगळे, रंगेबिरंगी, शांत, नखरेबाज, खोडकर, असंख्य. काटे दिले, पाने दिली. यांच्या जीवावर पक्ष्यांची घरे तयार झाली. पिढी वाढली. संरक्षण, संस्कार, परोपकार, काटकसर, शिस्त, धाडस, सत्य मिळाले. पाखरे उडून गेली. लांब पसरली, नभात, देशात, जगात, जीवनात. विसरली, काही नाही विसरली त्याला. तो शांतच आहे. त्याचे काटे टोचतात म्हणून त्याला हिनवणारे, त्याच्या काट्यांच्या शिस्तीवर घर बांधून, पिढी वाढवत गेले. 

तो शांत. अजून उन्हाळा, पावसाळा, एकटा, पाखरांची वाट पाहणारा, आसरा देणारा, सुख घेणारा, काटे अंगावर घेऊन वागणारा, टोचनारा. वय झाले, वादळ सुटले. पाय खंबीर, आसरा परदेशी, पाखरे गेलेली. पुन्हा एकटा. लढला, तगला, शेवटी तोल गेला, झुकला. झुकून दुसऱ्या पिढीला सावली दिली, आसरा दिला, अविरत. दिवस उजाडला. तप्त, उग्र, रुक्ष. डोळे उघडले, समोर धार, त्याने आयुष्यभर अस्मानाला दाखवलेली ! तिचा पगडा भारी. मन सुन्न. आली, घुसली काळजात, आरपार, रक्त, पाय गळाले, दृष्टी गेली. देह पडला. मातीत. कार्य संपले नाही. देह दिला, कृतज्ञता केली. सार्थकी लागले जीवन. जाताना त्याला एकच सुख, माझी पाखरं किती उंच गेली. नभात, अंतराळात, यशोशिखरावर. जीवनाचा आनंद मिळाला ! 

संस्कारहिन, निकसपणे आणि भोगवादामधून भसभस वाढलेली प्रवृत्ती, कणाकणाने वाढलेल्या संस्कृतीचा काय मुकाबला करणार !

सुसंस्कारित मूल हाच सुदृढ समाजाचा पाया आहे.
संस्कारांचे काटेच जीवनाला वाचवू शकतात !


शब्दांकन :
प्रा. अनिकेत भोसले
८९७५७११०८०

Monday, April 27, 2020

"माऊली आहे रं ती!"

*"माऊली आहे रं ती!"*
"आलं का गं पॉर कोलापूरास्न?", नेहमी प्रमाणेच सकाळी सकाळीच अंगणात आलेली आज्जी आमच्या आईला म्हणाली.
"आला आहे रात्रीच, थांबा बोलवते", आमची आई आज्जीला म्हणाली. 
आई मला म्हणाली शेजारची आज्जी आली आहे काय म्हणते ते बघ जरा. माझे काम टाकून मी अंगणात गेलो. अंघोळीला पाणी तापवायच्या चुलीपाशी आज्जी हात पाय शेकत बसली होती. अंगात खूप जुना पांढरा स्वेटर. हातात दोन तीन शिल्लक राहिलेल्या बांगड्या. पायात चप्पल नाही. कमरेत वाकल्यामुळे चालताना कायम साथ देणारी एक छोटी लाकडी काठी. एक डोळा पूर्णपणे मोतिबिंदूमुळे पांढरा झालेला. दुसऱ्या डोळ्यास नुकतीच मोतीबिंदूची लागण झालेली. आयुष्यभराच्या कष्टांमुळे कडक झालेले हात आणि सहज वाकवता न येणारी हाताची काही बोटे. आजोबांना जाऊन नुकतेच एक वर्ष झालेले. मुंबईला राहणारा तिचा एकुलता एक मुलगा, सून आणि एक पंधरा वर्षांचा नातू. गावाला आज्जी एकटीच आमच्या शेजारी त्यांच्या घरात एकटीच राहते. वय वर्षे पंच्याहत्तर, जख्खड म्हातारी. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला सांगतोय हे सगळं. गोष्ट तर पुढे आहे. असो.
आज्जी म्हणाली, "आरं लेका माझ्या पोराला  मिस कॉल दे की, आज त्याला सुट्टी आसल." आज्जी तिच्या पिशवीत ठेवलेला जुना मोबाईल मला देत म्हणाली.
मी म्हणालो थांबा जरा, देतो मिस कॉल. मी मिस कॉल दिला आणि आज्जी पाशी बसलो. तिच्यापाशी बसलं की तिला खूप आनंद होतो. आज्जी ला थोडे कमी ऐकू येते. मला लहानाचा मोठा होत असलेला पाहिला असल्याने आज्जीला माझ्याबद्दल खूप माया. आज्जी म्हणाली, "हाताच्या बोटात खूप ठसठस होतंय रं, दोन दिसापास्नी." मी म्हणालो दाखव बघू. आज्जीच्या बोटामध्ये जळणाचा काटा मोडला होता. तिला दिसत नसल्यामुळं तिने दुर्लक्ष केलं होतं आणि काटा तसाच आत राहिला होता. त्यामुळे तिला वेदना होत होत्या. मी आई कडून पिन मागून घेतली आणि आज्जीच्या हातातला तो काटा काढला, आज्जीला जराही दुखले नसावे इतका हळुवार. 
आज्जीच्या डोळ्यात दोन थेंब पाणी आले होते. तिला झालेल्या माझ्या स्पर्शाने ती आतून कळवळली होती. तिला या वयात आधार हवा होता. आज्जी एकटी पडली होती, तिला बाहेरगावी राहायला आवडत नव्हते. सून तिला घडत नव्हती. मुलग्याने नोकरी आणि बायको यांच्यापुढे हात  टेकले होते. आयुष्यभर अफाट कष्ट केले, ऊर फुटेस्तोवर शेती केली, बाप्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसले आणि आज तिला पाहायला कोणच नसावे याची खंत वाटली. 
तिला हवा होता एक आधाराचा हात. तिला हवी होती आपल्यांची साथ. तिलाही हवे होते नातवाचे प्रेम. तिलाही हवी होती सुनेची सोबत. आयुष्याच्या उत्तरार्धात तिलाही हवा होता आराम. मुलाच्या सोबत राहायला कोणत्या माऊलीला नको वाटेल. पण नियतीच्या फेऱ्यामध्ये तिचे म्हातारपण अडकले होते.
 "आरं माझ्याकडं आता ईना झालायस पोरा, आता माझं चार दिस राह्यलं", आज्जी मला सहजच बोलून जायची. त्यावेळी मनात वाटायचे की यांचे आता दिवस संपत आले आहेत, आपण तर तरुण आहोत, मनात आणलं तर अमर्याद मदत करू शकू. आपलं दुसऱ्याचं न करता आपल्याकडे मदत मागायला आलेल्या जीवाला मदत करणं हीच आपली संस्कृती आहे आणि उतारवयाकडे झुकलेल्या अशा मायाळू झाडांना मदत करणं आपलं कर्तव्यच आहे. आपलं स्टेटस, पद, प्रतिष्ठा, वय, वैचारिक भेद या सर्वांना बाजूला ठेऊन तुम्ही जेष्ठांना केलेल्या मदतीची पोहोच त्यांना झालेल्या आनंदातून घेऊ शकलात की बस, तुम्ही जिंकलात!
तिचे अश्रू वाहत नसले तरी काळजातील पाझर काही आटला नव्हता. शेवटी ती एक माऊलीच आहे आणि माऊलीला आपलं दुसऱ्याच मायेमध्ये तरी करता येत नाही. तिच्या बोटामध्ये रुतून बसलेला काटा तर मला काढता आला पण तिच्या काळजामध्ये रुतलेला काटा माझ्या हळव्या मनाला तश्याच वेदना देत राहिला. थंडगार वाऱ्याच्या हलक्या झुळुकीमुळे फुलत असलेल्या चुलीमधील विस्तवांकडे आज्जी एकटक पाहत होती. तिच्या मोबाईल ची रिंगटोन वाजायला लागली होती आणि या विचारचक्रात माझे लक्ष्य घरांच्या पायऱ्यांकडे गेले आणि मला दिसली आमच्यासाठी अहोरात्र झिजणारी माझी माऊली!!

शब्दांकन:-
अनिकेत भोसले
8975711080

"श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/राजपुरे" "त्याग आणि कष्टांतून गरुडझेप...!"



आप्तांचे आयुष्य सुगंधित आणि बहारदार बनवण्यासाठी चंदनरूपी वृक्ष जसा स्वतःला उगाळून घेत असतो आणि चैतन्य पसरवत असतो त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, रात्रंदिवस अपार कष्ट करून केवळ आणि केवळ त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे अनमोल दान केले, जे अहोरात्र झिजले ते चंदनरुपी वृक्ष म्हणजे श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे (दादा). दादांच्या जीवनाचा थोडक्यात उहापोह..
          दादांचा जन्म दि. ०१ जून १९५९ साली झाला. घरामध्ये दादांसहित पाच भावंडे होती. त्यांच्यात दादा आणि केशव हे दोघे भाऊ आणि कलावती, मीराबाई आणि सुनंदा या बहिणी. त्यावेळी घराचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती हेच होते. शेतीवरच कुटुंब चालत होते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील श्री. यशवंत केसू राजपुरे हे शेतकरी होते. तर मातोश्री अंजुबाई यशवंत राजपुरे! त्यांच्या आई कडक शिस्तीच्या असल्यामुळे सर्व मुलांचे संगोपन योग्य रीतीने झाले. वडिलांना आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं असं वाटतं होतं. मुलांना लागणारी शालेय फी भरण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी दिवसभर कष्ट करून मिळालेली मजुरी फक्त शिक्षणासाठी दिली. त्यामुळे या बिकट परिस्थितीत सुद्धा अपार कष्ट सोसून त्यांनी सर्व मुलांच्या शिक्षणावर भर दिला. दादांचे प्राथमिक शिक्षण पहिली १९६६ साली तर पाचवी १९७० साली दरेवाडी येथे झाले. त्यानंतरचे सातवी चे शिक्षण १९७२ साली कणुर या गावी तर हायस्कूल चे आठवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण १९७५ साली बावधन हायस्कूल, बावधन या ठिकाणी झाले. या वेळी सर्व राजपुरे कुटुंब अनपटवाडी ता. वाई येथे वास्तव्यास आले.
          दादा लहानपणापासूनच शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. दादांचा मूळचा स्वभाव खूप रागीट होता. ही देणगी त्यांना उपजतच त्यांच्या आई कडून मिळालेली होती. त्यानंतर दादा जसजसे मोठे होत गेले हा रागीट स्वभाव अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या मुळे अतिशय शांत होत गेला. दादांनी सन १९७८साली त्यांचे महाविद्यालयीन बारावी चे शिक्षण शिंदे हायस्कूल, वाई येथे घेतले. सन १९८१ साली बी. कॉम. ची पदवी आणि सन १९८३ साली एम. कॉम. ची पदवी वाई येथील किसनवीर महाविद्यालय मधून प्राप्त केली. दादांचे  शिक्षण म्हणजे अपार कष्टाचा नमुना आहे. दिवसभर वडिलांबरोबर शेतीत कष्टाची कामे करून दादा रात्रीचा अभ्यास करत असत. परत दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम जवळजवळ पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चालू राहिला. दादा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण मिळवून प्रथम यायचे. यामागील त्यांचे जिद्द आणि चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. दादांच्या शिक्षणासाठी त्यांचे दाजी सदाशिव शिर्के यांनी वेळोवेळी हवी ती मदत आणि मानसिक आधार दिला त्यामुळं दादा उच्चशिक्षित होऊ शकले. त्याकाळी गावात भीमा अण्णा, अर्जुन दादा आणि लाला भाऊ ही मंडळी ग्रॅज्युएट झाली होती. अनपटवाडी गावामध्ये शिक्षण क्षेत्रात दत्तबापू नंतर दादांनी आपल्या हुशारीने मान मिळवला. दादा म्हणजे गावात पदव्युत्तर शिक्षण घेणारी द्वितीय व्यक्ती होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि शेतीवर अवलंबून असूनही आपल्या भावंडांच्या शालेय शिक्षणाकडे दादांनी विशेष लक्ष दिले. लहान भाऊ केशव हा शाळेत अत्यंत हुशार आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याच्या शिक्षणावर दादांनी लक्ष केंद्रित केले.
          दादांनी स्वतःच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुंबई मध्ये सुध्दा नोकरी शोधली पण अपयश आले. दादांनी फॉरेस्ट विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. दिवसभर काबाडकष्ट आणि रात्रभर अभ्यास असा दिनक्रम सतत चालू ठेवला होता. ज्यावेळी ते परीक्षेला गेले तेव्हा पेपर लिहीत असताना अशक्तपनामुळे त्यांच्या डोळ्यांच्या समोर अंधार पसरला आणि त्यांना पेपर संपूर्ण लिहिता आला नाही. पदवी पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये मिळवणारा विद्यार्थी कमी दिसत असल्यामुळे पेपर अर्धवट लिहून परत आला. दादांना त्या वेळी नशिबाने साथ दिली नाही परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवला.
          सन १९९५ साली वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली. आता शिकत राहिले किंवा नोकरी शोधत राहिले तर भावंडांची शिक्षणे अर्धवट राहतील म्हणून दादांनी नोकरीचा शोध बंद केला कारण त्यांना सतत वाटत होते की " दादा ने नोकरी केली असती तर केशव (अप्पा) शिकला नसता!" त्यामुळे दादांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. केशवच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दादांनी केशवला आपल्या बहिणीकडे आणि दाजींकडे खंडाळा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी ठेवले. केशवने १९९२ साली लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बी. एससी. फिजिक्स ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये मिळवून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. केशवच्या या यश्यामुळे दादांच्या कष्टाचे सार्थक झाले.  पुढे केशवने १९९४ साली स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्टांनी शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र या विषयाची कठीण समजली जाणारी एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने लीलया मिळवली. तद्नंतर २००० साली अत्यंत परिश्रमाने आणि दादांच्या आशीर्वादाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एचडी. ही पदवी मिळवली. या सर्व यशशिखरांमागे दादांची समर्थ साथ, आधार आणि पाठिंबा होता. वडिलांचे स्वप्न दादांनी केशवला उच्चविद्याविभूषित करून पूर्ण करून दाखवले.
              दादांच्या पत्नी सुरेखा बाळासाहेब राजपुरे. त्यांनी दादांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक वळणावर खंबीर साथ दिली. वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांचा संसार यथायोग्य जोपासला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दादांची तिन्ही मुले कर्तबगार आणि कर्तुत्ववान आहेत. दादांचा मुलगा कु. आकाश बाळासाहेब राजपुरे हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार! आई वडिलांच्या कष्टांकडे पाहात त्याने आज जे यश मिळवले आहे ते अनपटवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यास पात्र आहे. तो सध्या मुंबई महानगरपालिका मध्ये अभियंता या पदावर कार्यरत आहे. अनपटवाडी गावातून मुंबई महानगरपालिका मध्ये प्रथम अभियंता होण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच मुलगी वृषाली बाळासाहेब राजपुरे ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून एम.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. आपल्या मुलांचे शिक्षण दादांनी पोटाला चिमटा काढून, काटकसर करून आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवले.
          दादांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा भाऊ केशव आणि बहिणींची साथ कायम मिळाली. दादांच्या बहिणी फुलाबाई शिर्के (म्हसवे), कलावती यादव (खंडाळा), शारदा निंबाळकर (वहागाव), मीराबाई ढमाळ (अंबारवडी), सुनंदा मतकर (विखळे) या सर्वांनी नेहमीच मानसिक आधार, प्रेम आणि जिव्हाळा दिला. हे प्रेम आणि आधार दादांना नव्याने आयुष्याशी झुंजण्याची ताकत देत होता.
          दादांचा लहान भाऊ केशव हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र अधिविभाग मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू आहे. केशवचे भौतिकशास्त्र या विषयातील संशोधनामध्ये देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त आणि बहुमूल्य कार्य आहे. एकंदरीतच केशवच्या यशामागे त्याचे वडील बंधू दादांचे अनेक आशीर्वाद आणि खंबीर साथ आहे. दादांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून केशव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
           दादांची तिन्ही मुले शिक्षित आणि स्थिरस्थावर आहेत. त्यांचे बंधू संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. दादांनी श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या भावंडांना तसेच मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कारित करून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. या जीवनप्रवासामध्ये आज दादा सुखी आयुष्य जगत आहेत. अपार कष्टांनी मिळालेल्या या अतुलनीय यशामुळे दादांची छाती नेहमीच गर्वाने फुलते! सर्व भावंडे आणि आपल्या मुलांचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नींची कणखर साथ, आधार, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांची जोड मिळाल्याने दादांना आपले आयुष्य सार्थकी लागले याचाही अभिमान वाटतो. दादांच्या संघर्षाची कहाणी भावी पिढ्यांच्या जीवनात चैतन्याची आणि कष्टाची ठिणगी बनेल यात तिळमात्र शंका नाही!
          दादांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...

शब्दांकन:
अनिकेत भोसले