त्याची सुरुवात झाली ती पावसाळ्यात. काही महिन्यांचा पावसाळा. उष्ण कटिबंधीय पानझडी चे पठार. त्याच्या हृदयाला हाक आली आणि चालू झाला प्रवास. त्याला जात, गोत्र, धर्म, प्रदेश, सीमा, मित्र, आई, बाबा, सोयी, सुविधा, आरक्षण, अनुकंपा, वशिला हे काहीच माहिती नाही त्याला फक्त उगवायची हाक आली आणि मानला त्यानं आदेश त्याच्या तत्वाचा. मातीच्या पोटातून वर पाहिले तेव्हा पाऊस होता. हर्षला, चेकळला, बहरला. असचं असतं आयुष्य नेहमी, असे समजण्याची चूक करायला तो मूर्ख नाही !
त्याचा पहिला उन्हाळा आला. वीत भर मातीच्या वर, वीत भर मातीच्या खाली. ना गर्व, प्रतिष्ठा, मान, सन्मान, हेवे-दावे. एकटाच. उन्ह, दख्खन च उन्ह ! रक्तात चिवटपणा, जिद्द, दोन्हीकडून वर सरण्याची. उष्ण झळया, कोरडी माती, ना पाणी ना गारवा. एकटा रणरणत्या उन्हात. मित्र नाही, कुटुंब नाही, सगे नाही आणि सोयरे नाही. चार दोन जगलेली पानं. या तापट सत्यानं मान जळून वाकली. झुकली, मोडली, माती पुन्हा दिसायला लागली. पण हात तर जिवंत आहेत. जगले, तगले, झगडले, लढले, वाढले. पुन्हा मान उभी केली. पण आनंद नाही आता, आता जबाबदारी. मातीत आणि आकाशात जाण्याची. निर्दयी काळे पाषाण लागले खाली, असंख्य टकरा देऊन पाण्याचा व अन्नाचा कण आणि कण गोळा करून स्वतःमध्ये साठवून ठेवला.
जसे क्षण, दिवस, ऋतू जाऊ लागले तो मोठा होऊ लागला. हसत, झुलत, रडत, खेळत. जाता कुठे येत नाही. पाय तर खोलात, आंधळे, तत्वांशी प्रामाणिक, बधिर, आकाश न पाहिलेले, स्थिर. वाढत राहिला. मोठा झाला. पाय खोल रोवलेले, पाण्याचा आणि अन्नाचा अंदाज घेणारे मित्रच जणू. अंगावर काटे. तीक्ष्ण, टोकदार, असंख्य, कडू. पानांचा आकार लहान, बारीक-सारीक, काटकसर करणारा. अंगावर जीर्ण झालेली पण कोणत्याही वाईट वादळात साथ देणारी काटेरी आणि जाड साल. रक्षक, विश्वासू, स्वओळख. नभात शिरलेले असंख्य हात. पसरलेले, उन्हाचे दान घेण्यासाठी. पक्षी आले. खूप, वेगवेगळे, रंगेबिरंगी, शांत, नखरेबाज, खोडकर, असंख्य. काटे दिले, पाने दिली. यांच्या जीवावर पक्ष्यांची घरे तयार झाली. पिढी वाढली. संरक्षण, संस्कार, परोपकार, काटकसर, शिस्त, धाडस, सत्य मिळाले. पाखरे उडून गेली. लांब पसरली, नभात, देशात, जगात, जीवनात. विसरली, काही नाही विसरली त्याला. तो शांतच आहे. त्याचे काटे टोचतात म्हणून त्याला हिनवणारे, त्याच्या काट्यांच्या शिस्तीवर घर बांधून, पिढी वाढवत गेले.
तो शांत. अजून उन्हाळा, पावसाळा, एकटा, पाखरांची वाट पाहणारा, आसरा देणारा, सुख घेणारा, काटे अंगावर घेऊन वागणारा, टोचनारा. वय झाले, वादळ सुटले. पाय खंबीर, आसरा परदेशी, पाखरे गेलेली. पुन्हा एकटा. लढला, तगला, शेवटी तोल गेला, झुकला. झुकून दुसऱ्या पिढीला सावली दिली, आसरा दिला, अविरत. दिवस उजाडला. तप्त, उग्र, रुक्ष. डोळे उघडले, समोर धार, त्याने आयुष्यभर अस्मानाला दाखवलेली ! तिचा पगडा भारी. मन सुन्न. आली, घुसली काळजात, आरपार, रक्त, पाय गळाले, दृष्टी गेली. देह पडला. मातीत. कार्य संपले नाही. देह दिला, कृतज्ञता केली. सार्थकी लागले जीवन. जाताना त्याला एकच सुख, माझी पाखरं किती उंच गेली. नभात, अंतराळात, यशोशिखरावर. जीवनाचा आनंद मिळाला !
संस्कारहिन, निकसपणे आणि भोगवादामधून भसभस वाढलेली प्रवृत्ती, कणाकणाने वाढलेल्या संस्कृतीचा काय मुकाबला करणार !
सुसंस्कारित मूल हाच सुदृढ समाजाचा पाया आहे.
संस्कारांचे काटेच जीवनाला वाचवू शकतात !
शब्दांकन :
प्रा. अनिकेत भोसले
८९७५७११०८०
No comments:
Post a Comment