Friday, September 4, 2020

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई

माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौ. सोनवणे बाई !

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

जन्म झाल्यानंतर मानवाच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक वाढ झपाट्याने व्हायला सुरुवात होते. सर्वप्रथम मुलाला त्याची आई खूप जवळची असते. माताच त्याची प्रथम गुरु असते. आईकडूनच मुले उच्चार, भाषा आणि हावभाव असे बरेच काही शिकत असतात. वय वर्ष पाच ते सहा वर्षांपर्यंत मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास बऱ्यापैकी झालेला असतो आणि या वयातच त्याला आपली प्रथम गुरु आईस सोडून शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. हा कालखंड खूपच नाजूक असतो. या कालखंडामध्ये शिक्षकांची तारेवरची कसरत होत असते. मुलाला त्याची आई ज्याप्रमाणे वागणूक देत असते, तशीच वागणूक त्याला शाळेतील बाईंकडून अभिप्रेत असते. तीच माया आणि वात्सल्य हवे असते. हे सर्व मुलाला मिळावे आणि तो शिक्षण क्षेत्रात टिकून राहावा यासाठी शाळेतील कार्यतत्पर शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या शिक्षण आणि आयुष्याचा श्रीगणेशा करणाऱ्या माझ्या आवडत्या शिक्षिका सौ. सोनवणे बाई या ही एक कार्यतत्पर शिक्षिका, त्यांच्याविषयी माझे मनोगत आणि कृतज्ञता !

माझ्या शिक्षणाची सुरुवात सन २००१ मध्ये झाली आणि याच कालखंडात माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षक म्हणून लाभल्या, या गोष्टीबाबत मी नेहमीच देवाचा ऋणी राहील. "बाईंनीच माझ्या शिक्षणाची मुहूर्तमेढ गुणवत्तापूर्ण रीतीने रोवली होती", हे सांगताना अभिमानाने उर भरून येतो. इयत्ता पहिली ते चौथी या महत्त्वाच्या वर्षांचे शिक्षण आणि संस्कार बाईंनी मला दिले की जे आजही आदर्शवत आहेत. हेच संस्कार आणि शिक्षण मी आज माझ्या विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज जे काही आहे ते फक्त सौ. सोनवणे बाई यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारांमुळेच हे मी छातीठोक पणे सांगू शकतो.

शिक्षणाच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये माझ्या आईने मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगांव येथे  प्रवेश घेतला. सन २००१ पासून इयत्ता पहिलीपासून या शिक्षणप्रवासाला सुरुवात झाली. सौ. सोनवणे बाई मला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. आम्हाला सर्वप्रथम आमचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता अश्या सर्व गोष्टी शिकवल्या. बोटाला धरून ज्याप्रमाणे आई बालकाला चालायला शिकवते त्याप्रमाणे आमची शिक्षणातील सुरुवात बाईंनी बोटाला धरून केली. कपडे नेहमी स्वच्छच घालायला हवेत, कपडा फाटलेला असेल तरी चालेल पण मळका असू नये, स्वतःचे बस्कर हवे, हाता - पायाची नखे कापायलाच हवीत, केस कापून नीट विंचारलेले असावेत, डबे हात स्वच्छ धुवून खावेत, जेवताना खाली सांडायचे नाही, कचरा करायचा नाही, वर्ग स्वच्छ ठेवावा अश्या चांगल्या सवयी अगदी लहानपणापासून लावल्या होत्या. आमचा वर्ग, सर्व विद्यार्थी आणि बाई हे एक आदर्शवत कुटुंबच झाले होते. 

सौ. सोनवणे बाई साधी राहणी आणि उच्च विचासरणी या तत्वाला धरुनच आम्हाला घडवत होत्या. त्या अतिशय प्रेमळ, मायाळू, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या, चाणाक्ष तसेच प्रसंगी कडक आणि शिस्तप्रिय सुद्धा होत्या. त्यांच्या या सर्व गुणांचा  सकारात्मक परिणाम आमच्यावर नकळत होत होता. मुले नेहमी आपल्या शिक्षकाचे अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकाने नेहमीच आपले वागणे हे आदर्शवत ठेवले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. 

आम्हाला आमचे शिक्षण चांगल्या प्रकारे मिळावे यासाठी बाईंचा नेहमीच प्रयत्न असे. अगदी पोटतिडकीने जे - जे शक्य आहे ते आमच्यासाठी करत असत. आमच्यासाठी अंकलीप्या, पेन्सिल्स आणण्यापासून ते चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे सराव पेपर उपलब्ध करण्यापर्यंत बाईंनी आम्हाला सर्व मदत केली आहे. वर्गात सर्वांना आठवड्याला बाई पेन्सिलचे आकडे द्यायच्या, त्याची सर आजही कोणत्या पेनाला येत नाही. बरोबर उत्तराला शाबासकी, बक्षीस आणि टाळ्यांचा कडकडाट मिळायचा. बाई वर्गाचे मंत्रिमंडळ बनवून कामे वाटून देत असत. वर्गात गट पाडलेले असायचे. त्यानुसार गटप्रमुख याने संपूर्ण गट नियंत्रणात ठेवणे, त्यांची माहिती ठेवणे इत्यादी कामे असत. यातून बाईंनी नेतृत्वगुण आमच्यामध्ये बानवले. बाईंची शिकवण्याची पद्धत निराळी होती. त्या अनुभव देत शिकवत असत. मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गातून विविध उदाहरणे देऊन अध्यापन करीत असल्यामुळे अध्यापन सफल होत असे. वर्गात शिकवताना बाई मुलांना कल्पनाविश्वात घेऊन जात आणि मुले भान हरपून जात. बाईंनी कोणत्याही क्षणी म्हटले की,  "आज गोष्ट ऐकणार काय?" त्याक्षणी संपूर्ण वर्ग सगळा आळस झटकून, असेल ते वही पुस्तक बाजूला ठेवून, हात बांधून बाई सांगणार आहेत ती गोष्ट ऐकायला तयार असायचा. ही गोष्ट सोपी नाही. यासाठी अध्यापन हे विद्यार्थ्यांचे वय, आकलन आणि आवड यांचा विचार करून करावे लागते. अवधान खेचण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची ही कला बाईंकडे होती. गोष्ट चालू असताना संपूर्ण वर्ग संमोहित झाल्यासारखा एकाग्र चित्ताने बाईंच्या गोष्टीकडे कान देऊन ऐकत असायचा. हे कौशल्य बाईंकडे होते आणि खरंच त्याबाबतीत आम्ही नशीबवान आहोत कारण आम्हाला कल्पनाविलास आणि परिकल्पनेतून आकलन करून घेण्याची सवय या गोष्टींमुळेच लागली आहे.

वर्गात वार्षिक नियोजन लावणे, मुलांना ते वाचावयास सांगणे, यातून मुलांना चौकस बनवण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या आकाराच्या कागदाच्या रंगीत पताका कापणे, वर्गात उंचावर मापे घेऊन आडवे - उभे दोरे बांधणे, त्यांवर पताका चिकटवणे यांमध्ये मार्गदर्शन करणे, यांतून मुलांच्यात गट आणि सहकार्य वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न, स्वतःची कामे स्वतः करणे, कपड्याला बटणे लावणे, कपडे शिवणे, कापडी पिशव्या शिवणे अशी अनेक स्वावलंबाची कामे करण्यास शिकवले,  वर्गात फलकलेखन करण्यास प्रत्येकाला संधी देणे, मोठ्याने वाचण्यास सांगणे, गट पाडून प्रश्नोत्तरे आणि त्यांचे गुण फळ्यावर लिहून चुरस वाढवणे, प्रश्नमंजुषा आणि गुणदान करणे असे विद्यार्थ्याने स्वतः पुढे येऊन करावयाचे अनेक उपक्रम बाईंनी राबवले होते आणि आम्हाला अष्टपैलू बनवण्याचा जणू चंगच बांधला होता.

बाईंचे अभ्यासाबरोबरच आमच्या शारीरिक विकासाकडे पण खूप लक्ष असायचे. दर शनिवारी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर आमच्या वर्गात व्यायामाचा आणि योगासनांचा खास तास चालू होई. प्रत्येकाने आप आपले बस्कर घेऊन यायचे, जागा तयार करायची आणि बाईंच्या पाठोपाठ आसने करायची. सर्व आसने करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असे. सर्व आसने झाल्यानंतर शेवटी शवासन असायचे. या आसनात असताना बाईंनी दिलेल्या सूचना अजूनही जश्याच्या तश्या आजही योगासने करताना आठवतात. बाईंनी दिलेला हा अनमोल ठेवा आजही मी जपला आहे. अभ्यासाबरोबर खेळातही आपण पुढे पाहिजे यासाठी खेळाच्या तासाला वेगवेगळे खेळ घेतले जायचे. या कालखंडात एकही असा दिवस नसेल की ज्या दिवशी बाईंनी आम्हाला नवे काही शिकवले नसेल. 

शालेय अभ्यासक्रमात असणारे मुख्य विषय जसे की गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांत आणि सर्वच भाषा विषयांत बाई अत्यंत तरबेज होत्या. त्यांनी आम्हालाही या विषयांत तरबेज कसे होता येईल याचे मार्गदर्शन केले आणि तसे प्रयत्न केले. चित्रकला, निबंधलेखन, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, कलाकुसरीचे काम इत्यादी मध्ये आवड निर्माण केली. ही प्रत्येक गोष्ट आपणास त्यावेळी जरी अवघड वाटत असली तरी तिचे दूरगामी परिणाम चांगले आणि उपयुक्त असतात हे मला आज समजत आहे. याच छोट्या -छोट्या गोष्टींमधून शिकून आजचा मी तयार झालो आहे. बाईंनी हे गुण मला त्यावेळी दिले आहेत की जे अजूनही उपयुक्त आहेत.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या तयारीसाठी बाईंनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. शाळेतील तास झाल्यानंतर मुलांचा अजून सराव होण्यासाठी ज्यादातास विनामोबदला बाईंनी सुरू केले. यामध्ये विविध क्लुप्त्या, सूत्रांचा वापर, योग्य अंदाज अश्या अनेक नवीन गोष्टींचे अध्यापन होत असे. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान आणि गणितामध्ये आम्हाला परिपक्व बनवले. तासांसाठी आम्ही बाईंच्या घरी शाळा सुटल्यानंतर जात असू. बाई वाई वरून विविध सराव चाचण्या मागवत असत. आम्हाला ओळीने बसवून अगदी कडक शिस्तीने त्या सोडवून घेतल्या जात असत. अखेर बाईंच्या प्रयत्नांना यश आले आणि आमच्या वर्गातील सर्वांना खूप छान गुण मिळाले होते. बाईंचे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असायचे. त्याचे चांगले - वाईट गुण, सवयी, आवडी सर्व बाईंना माहीत असायच्या. आमच्याकडुन काही चुका झाल्याही पण योग्य समझ आणि वागणूक देऊन आम्हास घडवले. त्यामुळे प्रत्येकाचे मूल्यमापन आणि व्यक्तिमत्व विकास योग्य रीतीने झाला.

आम्हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण, मूल्यशिक्षण, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, काटकसर आणि भूतदया अश्या अनेक जीवनोपयोगी बाबींचे रोपण त्या लहान संस्कारक्षम वयात सौ. सोनवणे बाईंनी केले आणि आम्हाला पुढील शिक्षणासाठी आमच्या पायावर उभे केले. त्यांनी आम्हाला भविष्याच्या दृष्टीने आणि पुढील वाटचालीचा मागोवा घेऊनच शिकवले आहे. बाईंनी त्यांच्या बदली होण्याच्या अगोदरच्या कालावधीत आम्हाला म्हणजे विविध विषयांत तेज असणाऱ्या मुलांना त्या- त्या विषयांच्या उच्च वर्गांच्या शिक्षकांची भेट घालून दिली होती. यांच्यावर लक्ष ठेवा हे माझे आवडते आणि होतकरू विद्यार्थी आहेत असे बजावल्याचे आजही मला आठवते. आपल्या विद्यार्थ्यांची अशी काळजी घेणारा शिक्षक लाभणे हेच आमचे भाग्य !

सन २००१ ते २००५ ही वर्षे बाईंनी आम्हाला घडवण्यात घालवली आहेत. ही वर्षेच खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्याची पायभरणीची वर्षे ठरली आहेत. आम्ही चौथी पास झाल्यानंतर बाईंची अचानक बदली झाली. सगळा वर्ग हिरमुसला होता. चार वर्ष ज्या बाईंनी आईसारखे वात्सल्य देऊन आम्हाला जपलं होतं त्या बाई आम्हाला सोडून दुसऱ्या शाळेसाठी निघाल्या होत्या. सर्वांचे दुःख सारखेच होते. पण त्या वयात ते दुःख फक्त अश्रुंच्या माध्यमातून व्यक्त होत होते. बाई अजून खूप इयत्ता आमच्याबरोबर असायला हव्या होत्या हीच खंत मनाला लागून राहिली होती. त्यादिवशी सर्वांनी बाईंना निरोप दिला आणि बाई आमच्या सर्वांच्याकडे अनेक आठवणी ठेवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ झाल्या..!

आजही जेव्हा बाईंची भेट होते तेव्हा आई नंतर मिळालेल्या खऱ्या गुरूची आठवण होते. त्यांच्याशी किती - किती बोलावे असे वाटते, माझा आनंद गगनात मावत नाही. कारण हीच ती शाळामाऊली आहे जीने मला जपलं, तयार केलं, लढण्यास शिकवलं, जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणा देऊ केला आणि स्वावलंबी बनवलं. आजच्या या पवित्र दिनी बाई आपणास शतशः वंदन आणि सादर प्रणाम करतो.

आज ५ सप्टेंबर शिक्षकदिन आपल्या प्रती आदरभाव आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपण आम्हास एक उत्कृष्ठ शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून लाभला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सस्नेह नमस्कार !

शिक्षकदिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ! आपणास आरोग्यपूर्ण आणि आनंददायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आपला विद्यार्थी
अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०