Wednesday, December 30, 2020

सरत्या दशकाचा निरोप घेताना प्रिय पप्पांना पत्र....

प्रिय पप्पा...

          प्रिय पप्पा आज २०२० वर्षाचा शेवटचा दिवस. सरते शेवटी तुमच्या आठवणींच्या भाराने माझ्या पापण्यांचा धीर परत एकदा सुटला आणि तुम्हाला पत्र लिहावेसे वाटले. माझी खूप आठवण येत असेल ना तुम्हाला. तुम्ही देवापाशी जाऊन दहा महिने झाले. तुम्हाला आजही आठवत असेल ना आपली शेवटची भेट, दहा महिने उलटून गेले तरी कालचीच वाटणारी. "माझी कमी भासू देऊ नको, तू माझा खंबीर मुलगा आहेस, मृत्यू कोणाला नाही, हे जुने झालेले शरीर बदलून परत नव्याने सुरुवात करीन, रडायचं नाही, मी तुला सोडून कधीही जाणार नाही, परत येईन ! अगदी कालच बोलला होता तुम्ही हे सर्व. मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागतोय. काळजी करू नका. पण मला परत एकदा भेटायला याल का?

          "तुमचा श्वास थांबला आहे" मी ऐकलेलं हे वाक्य आठवलं की मनाचा आणि हृदयाचा थरकाप अजूनही उडतो. भर उन्हात हात - पाय बर्फासारखे थंड पडतात आणि ऐन थंडीत दरदरून घाम फुटतो. शेजारच्या जगाचे भान राहत नाही.  पप्पा, तुमच्याकडे येताना प्रत्येक पाऊल खोल दरीत गेल्याचा आणि अंगातून सर्व ऊर्जा गेल्याचा अनुभव मला विसरता येत नाही. बाप असल्याच्या आणि आपण पोरके होण्याच्या मध्ये अगदी थोडा काळ असतो. हा काळ कधीही दयाळू नसतो. तुमचं सर्वस्व, तुमचं प्रेम, भावना, नातं आणि अस्तित्व ओरबाडून नेणारा निर्दयी काळ या वर्षी मला पाहायला मिळाला. मृत्यू पुढे आर्जवे शून्य होतात. यावर्षी मृत्यू पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तो येतो तेव्हा कोणाचंही ऐकत नाही. मात्र जाताना कानशिलात अशी चापट मारून जातो की त्याच्याशिवाय दुसरे काही सत्य असेल याचे भानच राहत नाही. तुम्हाला शक्य असल्यास त्याला शिक्षा करा, खूप शिक्षा करा, त्याने मला खूप रडवले आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये माझ्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची विचारपूस करणारे तुम्ही, आज माझ्या न थांबणाऱ्या अश्रुंच्या धारांसाठी तुमच्याबरोबर गेलेल्या मृत्यूला शिक्षा कराल ना? पप्पा मला एकदा परत दिसाल का ?
          पप्पा खर सांगा, एवढ्या लवकर जाणं तुम्हाला तरी पटलं का. मला इथे एकटे सोडून जाताना तुम्हाला थोडी भीती वाटलीच असणार. तरी असं काय महत्वाचं काम निघालं तुमचं की तुम्ही अजून परत आलाच नाहीत. एवढी धडपड केली तुम्ही मुलांसाठी आणि संसारासाठी, अर्धवट सोडून जाताना तुम्हालाही त्रास झालाच असणार. मी पहिलीत असो की नोकरीमध्ये घरातून बाहेर जाताना नियमित माझा पापा घेऊन सावकाश जा आणि नीट ये म्हणणारे तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये मला परत कधीच दिसत नाही . किती किती शोधलय मी तुम्हाला या दहा महिन्यांत. पण तुम्ही दिसत नाही. पण माझ्याजवळ असल्याचा भास नेहमी होतो. तुम्हाला शोधून दमलो की रात्र पसरते. मी रात्रीची वाट पाहत असतो. पप्पा मला तुम्ही रोज रात्री माझ्या स्वप्नांमध्ये भेटायला येता त्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आणि धन्यवाद. न चुकता तुमच्या बोलण्याची, कामांची, आयुष्याची आंदोलने माझ्या स्वप्नात होत असतात. मग जाणवतं की तुम्ही जरी माझ्याजवळ नसलात तरी माझ्यामध्ये आहात. पप्पा तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहाल ना? तुमच्याशी बोलल्या शिवाय करमत नाही हो.

          दादाच्या बाळाची वाट तुम्ही आतुरतेने पाहिली होती ना. बाळाच्या चाहुलीने केवढा आनंद झाला होता तुम्हाला. या वर्षी एकदाच बाबा बाबा हे शब्द कानावर पडण्यासाठी तुम्ही कासावीस झाला होतात. तुम्ही गेल्यानंतर सहा महिन्यांनी बाळ घरात आले आहे. त्याला आई, वडील, आजी, मावशी, आत्या, काका कोण असतात हे नंतर कळेलच पण बाबा कोण आणि काय असतात ह्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही मला ताकद द्याल ना?

          माझ्या सर्व यशांमधे शाबासकी देऊन पाठ थोपटणारे तुम्ही, माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवून सहशिक्षकांना खुले आव्हान देणारे, माझ्या शिक्षकी पदवीच्या प्रवेशासाठी मला नेणारे, तुम्ही सांगितलेली पदवी मी मिळवली आहे त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि मला शाबासकी देण्यासाठी कधी येणार आहात ते कळवा तुमची प्रकर्षाने वाट पाहत आहे. पप्पा तुम्ही नक्की याल ना?

          सगळ्यांशी बोलतोय पण पप्पा म्हणून हाक मारू शकत नाही. तुम्हाला अनुभवतोय पण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही. परंतु मला विश्वास आहे की तुमचे आमच्यावर लक्ष आहे. नेहमी शुभाशीर्वाद आहेत. माझ्या आयुष्याची तुम्ही पाहिलेली स्वप्ने येत्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. काळजी नसावी. अश्रू थांबत नाहीत आणि शब्दही. मला माहित आहे की माझं अश्रू ढाळत बसणं तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळे अधिक त्रास न देता पाठीशी राहण्याच्या वचनावर पत्रसमाप्ती करतो. 

काळजी घ्या पप्पा !

तुमचा लाडका मुलगा,
अनिकेत