Saturday, June 19, 2021

पितृदिन विशेष

पितृदिन निमित्ताने..! बाप..!
(२० जून २०२१) 

जून चा तिसरा रविवार म्हणजे पितृदिन साजरा करण्याचा दिवस. बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. खरे म्हणजे बापाचा कोणताही दिवस नसतो, आपला प्रत्येक दिवस बापामुळेच असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व असून देवाला प्रत्येकापाशी जाता येत नाही म्हणून त्याने सर्वांना वात्सल्यरुपी आई दिली. आई आपल्या घराचे मांगल्य असते. असे असले तरी बाप घराचे अस्तित्व असतो. आईसह सर्व कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो बाप ! याच बापाविषयी काही शब्द....

बाप हा शब्द जरी दोन अक्षरी, साधा सोपा वाटत असला तरी बाप ही उपाधी मिरवण्यासाठी जन्म घेतलेल्या दिवसापासून ते मरणापर्यंतचे सर्व अनुभव पणाला लावावे लागतात. बाप हे व्यक्तिमत्व काय असते? बापाचे आणि कुटुंबाचे काय नाते असते? बाप असा का वागतो? बापाला कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात? बापाला असणाऱ्या भावना आपणास का दिसत नाहीत? बापाला कोण - कोणत्या यातना होतात? बाप म्हणजे नक्की काय? या सर्वांची उत्तरे फक्त एकच गोष्ट देऊ शकते. ती गोष्ट म्हणजे बापाचे स्थान ! बापाच्या स्थानी आलेल्या प्रत्येकाला या प्रकारच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळायला लागतात. एक-एक कोडे उलगडायला लागते. बापाचा अर्थ कळतो तो याच ठिकाणी !

कुटुंबाची संरक्षक भिंत - बाप !
आपले घर चालवताना बापाला कठोर भूमिका घ्याव्या लागतात. त्यामुळे त्याचे स्वरूप थोडे रागीट, शिस्तप्रिय आणि कठोर भासते. बापाने असे असायलाच हवे; कारण त्याच्यावर कुटुंबाच्या संरक्षणाची आणि पालन पोषणाची जबाबदारी असते. सर्वांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य असते. हे कर्तव्य निभावत असताना त्याला बाहेरील अपप्रवृत्तींपासून आपल्या माणसांचे रक्षण करायचे असते. समाजातील विचार प्रवाह, लोकांच्या सवयी, आवडी - निवडी, भाषा, वागणूक आणि संस्कार याबाबतीत त्याला काटेकोर राहावे लागते. तसे न राहिल्यास मुलांच्या अंगी सद्गुण, संस्कार, परोपकाराची भावना, सत्य आणि सदाचार या गुणांची कमतरता राहते. ही कमी राहू नये म्हणून बाप कुटुंबाचे सर्व बाबतीत संरक्षण करीत असतो. कठोर वागत असतो. वरून जरी बाप कितीही कठोर वाटत असला तरी आतून प्रेमळच असतो ! आपले बाबा, पप्पा, वडील जेव्हा आपणास काही उपदेश करत असतात किंवा काही गोष्टी समजावून सांगत असतात तेव्हा त्या कधीही हलक्यात घेऊ नका. त्या एका वाक्यामागे त्यांच्या आयुष्याचा अनुभव असतो. ते आपल्या भल्यासाठीच आपणास वारंवार सांगत असतात. 

नवीन पिढीचा अनुभव ग्रंथ - बाप !
बापालाही बाप असतो. या बापाकडूनच जीवन योग्य रीतीने आणि आनंदाने जगण्याचा मंत्र मिळतो आणि हे चक्र असेच चालू राहते. आपल्या बापाच्या जागी आपण आल्यानंतर आपणास कौटुंबिक जबाबदाऱ्या समजायला लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना अतोनात कष्ट सोसावे लागतात. कष्ट सोसत असताना निवडलेले मार्ग कसे चांगले किंवा वाईट होते, घेतलेले निर्णय कितपत योग्य आणि अयोग्य ठरले. निर्णय घेताना चुका कशा होतात, झालेल्या चुका कश्या सुधाराव्यात, निर्णयात भावनेला किती स्थान असावे, वाईट प्रसंगातून बाहेर कसे पडायचे, कोणती शक्कल लढवावी, नातेसंबंध कसे जपावेत, व्यवहार कसे करावेत, व्यवहारात सावध कसे राहावे, अर्थार्जन आणि अर्थ बचत करण्याचे कानमंत्र कोणते, कोणत्या वयात आपण काय केले पाहिजे, चांगल्या सवयी कोणत्या, शरीर तंदुरुस्त ठेवून आजारावर मात कशी करावी, समाजातील आपली वागणूक कशी असावी, समाजात आपले स्थान मिळवून ते कसे टिकवायचे अश्या एक ना असंख्य गोष्टींची आणि प्रश्नांची उत्तरे आपल्या बापाला त्याच्या आयुष्यातून मिळालेली असतात आणि आपणास आपल्या बापाच्या आयुष्यातून रोज मिळत असतात. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. बाप या ग्रंथाचे दररोज एक - एक पान पालटले जात असते. अखेरीस संपूर्ण ग्रंथ आटोपतो. हा ग्रंथ आटोपण्या अगोदर त्यामधून जेवढे ज्ञान आणि अनुभव आपल्याला घेता येतील तेवढे घ्यावे. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावे एवढीच अपेक्षा या ग्रंथाची असते.

वादळे झेलनारे जहाज- बाप !
आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग असे येतात की त्यांमधून बाहेर पडून पूर्ववत आयुष्य जगावे लागते. हे वाटते तेवढे सोपे नाही. यासाठी प्रचंड मानसिक शक्ती आणि सहनशीलता अंगी असावी लागते. बापाला असले प्रसंग पचवण्याची ताकत प्राप्त होते ती अगदी लहापणापासूनच. कितीही मोठा दुःखाचा प्रसंग आला तरी बाप संसाराची गाडी पटरीवरून खाली जावू देत नाही. लहानपणी ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले, लाड केले ते आवडते आजी आणि आजोबा त्याला सोडून निघून जातात. येथूनच दुःखाची ओळख होत जाते. हळूहळू आप्त, जवळचे नातेवाईक, शेजारील व्यक्ती, घरातील व्यक्ती, आई, बाबा सोडून जातात. हे सर्व त्याला परिचित होऊन दुःख सोसण्याची ताकत त्याच्यामध्ये तयार होते. सर्व दुःख सोसून आपल्या कुटुंबासाठी पुन्हा नव्याने कामाला लागण्याची उमेद त्याला आपल्या परिवाराकडे पाहून येते.  आयुष्यभर या ना त्या मार्गाने दुःख सोसणाऱ्या बापाला आपल्या मुलांकडून थोड्या सुखाची , प्रेमाची आणि चांगल्या संवादाची अपेक्षा असते; पण हे सुध्दा मिळाले नाही तर बाप खचून जातो. त्याला आपलेपणा हवा असतो, जिव्हाळा हवा असतो आपल्या माणसांकडून !

निस्वार्थी , दानशूर - बाप !
बापाला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा त्याची मुले आणि परिवार त्याच्यामुळे आनंदात असतात. हसत, बागडत, सुखाने जगणाऱ्या आपल्या परिवाराशिवाय बापाला दुसरी कोणतीही गोष्ट मौल्यवान वाटत नाही. बाप असे समजतो की, ' मला कितीही कष्ट सोसावे लागले तरी सोसेन पण माझ्या पाखरांना काही कमी पडू देणार नाही. त्यांना आयुष्यातील हर एक गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन. त्यांना आयुष्यातील दुःखापासून लांब ठेवेन.' यासाठी बाप आपले सर्वस्व अर्पण करत असतो. आयुष्यातील एक वेळ बापावर अशी येते की त्याला आपल्या परिवाराशिवाय दुसरे काही महत्त्वाचे असेल याची जाणीव राहत नाही. स्वतः अनेक त्रास सहन करून, स्वतःच्या मौजमजा बाजूला ठेवून, एक - एक रुपया वाचवून आपल्या मुलांचे भविष्य तयार करण्याचे स्वप्न पाहणारा देवदूत म्हणजे बाप असतो.

पोटच्या मुलीसाठी, जेव्हा ती जन्माला आली त्या दिवसापासून ते तिचे हात पिवळे करण्यापर्यंत सर्व बाबींचे स्वप्न पाहणारा, नियोजन करणारा आणि अमलात आणणारा बाप असतो !

मूल जन्माला आल्यानंतर अतोनात आनंद होणारा परंतु वरवर न दाखवणारा बाप असतो !

घरासाठी रोजच्या रोज मरणारा, रक्त आणि घाम एक करणारा, उन्हापावसाची तमा न बाळगता पोरांच्या भाकरीची सोय करणारा बाप असतो ! 

समाजाच्या तप्त आणि वास्तव नजरेच्या आगीपासून कुटुंबाला शाबूत ठेवणारा सेनापती म्हणजे बाप असतो !

वय झाल्यानंतर मुलांची उद्धट बोलणी ऐकूनही त्याच्याच आसमंतात शांत राहणारा, मुलांचे संसार व्यवस्थित चालावेत याची काळजी करणारा बाप असतो !

आयुष्यभराच्या कष्टाच्या मोबदल्यात फक्त प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि सुखाची अपेक्षा करणारा बाप असतो !

तुमच्या आमच्या अस्तित्वाचे कारण असणाऱ्या, देवाच्याही आधी ज्याला पुजायला हवे तो बाप असतो !

आपल्या बापाकडे एकदा प्रेमळ नजरेने पाहा; तुमच्या मदतीसाठी आलेला देव सापडेल !

सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


- शब्दांकन 
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०