Thursday, May 13, 2021

शिरगांव रोहिडेश्वर वरील अनोखी शंभर मंदिरे !

  १०० मंदिर समूह

"सत्वर पाव गे मला,
भवानी आई रोडगा वाहीन तुला,
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,
एकलीच राहू दे मला,
भवानी आई, रोडगा वाहीन तुला"

शिरगांव ता.वाई निसर्गसंपदा, वनराई आणि प्राचीन वास्तु असणारे गाव. गावाच्या तिन्ही बाजूंनी वेढलेला डोंगर, शेतजमिनी आणि मानवी वस्त्या असा सर्व परिसर मिळून सरासरी बाराशे हेक्टर क्षेत्र आहे. गावात अनेक मंदिरे, प्राचीन वास्तू असून काही डोंगर भागात स्थापित आहेत. शिरगांवची पांडवकालीन लेणी, प्राचीन दगडी आणि सागवानामध्ये बांधलेली मंदिरे, पाण्याच्या मुख्य प्रपातातील दगडी गोमुख, तारणगिरी महाराज जिवंत समाधी मठ, भक्कम पिंपळ पार आणि शिरगांवच्या पूर्व सीमेवर असणाऱ्या डोंगरावरील अनोखी छोटी शंभर मंदिरे ! 
सदर लेख गावाच्या पूर्व सीमेवरील मुख्य डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्या अनोख्या छोट्या शंभर मंदिरांना समर्पित !
  तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले शिरगांव

•जनमानस - 
इतिहास संशोधन करीत असताना संशोधकाच्या मार्गात येणारा प्रथम टप्पा म्हणजे आख्यायिका, जनमानस, लोकांच्या समजुती आणि समाजात प्रचलित झालेल्या गोष्टी. गावच्या सीमेवरील डोंगरावर असणाऱ्या शंभर मंदिरे यांच्या बाबतीतही अश्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. खूप उंचावर असणारा डोंगर माथा, प्रखर ऊन, रानटी जनावरे आणि अनामिक भीती यांमुळे ही मंदिरे एवढी प्रसिद्ध नसली तरी सध्या हयात असणाऱ्या ज्येष्ठ माणसांकडून थोडीफार माहिती समजते.
 पूर्वेकडील डोंगर(शिखरावर १०० मंदिर समूह)

  टुमदार शिरगांव, घाट आणि वाई - वाठार मार्ग

•मंदिरांचे स्थान -
शिरगांवच्या पूर्वेकडील मुख्य डोंगरावर ही मंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून सरासरी १३०० मीटर उंचीवर असणाऱ्या डोंगरमाथ्यावर शिरगांव आणि सर्कलवाडी ता. कोरेगांव यांच्या सीमेवर मंदिरांचा समुदाय आहे. सदरील डोंगराची उत्तर बाजू सोडली तर हा डोंगर चढण्यासाठी खूप कठीण आहे. याच डोंगरातून वाई - वाठार मार्गावरील शिरगांव घाट गेलेला आहे. डोंगरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग शिरगांव गावाकडून डोंगरांचे टप्पे ओलांडत मुख्य डोंगराच्या दक्षिण सुळकेवजा कड्यातून वर जातो. हा मार्ग अतिशय बिकट असून सरळ कडे आणि दोन्ही बाजूला खोल दऱ्या असल्यामुळे धोकादायक आहे. दुसरा मार्ग उत्तरेकडील घाट माथ्यावरून सर्कलवाडी गावाच्या हद्दीतून डोंगरावर आलेला आहे. ही मळलेली पायवाट असल्यामुळे धोकादायक नाही.
 
        रोहिडेश्र्वर माथा( मंदिर परिसर)

•परिसर -
मुख्य डोंगर हा माथ्यावर उत्तरेकडे त्रिकोणी आणि दक्षिणेकडे विंचू नांगी सारखा पसरलेला आहे. माथ्यावर सरासरी अठरा एकर क्षेत्र आहे. अनोखी शंभर मंदिरे डोंगराच्या माथ्यावर त्रिकोणी भागात असणाऱ्या गर्द झाडीमध्ये वसलेली आहेत. मंदिरे जमिनीवर ठेवलेल्या अवस्थेत असून याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, मोठे गवत, वेली, पाण्याचे डोह आणि रानटी जनावरांचा वावर आहे. डोंगर उंची जास्त असल्यामुळे तीव्र ऊन लागते त्यामुळे सहसा या भागात कोणी जात नाही. सदरील ठिकाण अतिशय उंचीवर असल्यामुळे प्राचीन काळी येथे गुरेचराई होत नव्हती. सध्या मळलेल्या वाटेने सोडून दिलेली जनावरे माथ्यावर येत असतात. 
          पांडव गुहा असलेला उत्तरेकडील डोंगर

•मंदिरांची रचना :- 
मंदिर म्हटले की ते एका ठराविक देवतेचे असते हे सर्वमान्य आहे. या मंदिरांतील मुख्य देवता श्री. रोडजाई देवी आहे. गावच्या उत्तरेकडील डोंगराला रोहिडा किंवा रोहिडेश्वर असे नाव आहे. त्यावरूनच तिथे असणाऱ्या देवीला रोहिडजाई आणि नंतर अपभ्रंश होऊन रोडजाई असे नामकरण करण्यात आले असावे. प्राचीन काळी येथे शंभर मंदिरे होती अशी माहिती गावातील ज्येष्ठ मंडळी देतात. हल्ली येथे होणाऱ्या चराई मुळे जनावरांच्या वावरामुळे काही मंदिरे फुटलेली आहेत. काही पूर्णपणे माती आणि चिखलात रुतून गेलेली आहेत. सध्या येथे साधारण ४० सुस्थितीत, २०-३० भग्न झालेली आणि उर्वरित अजून सापडलेली नाहीत किंवा नाहीशी झालेली आहेत.
   सुरक्षित केलेली सुस्थितीतील काही मंदिरे

एकच देवता रोडजाई देवीची ही मंदिरे आहेत. सर्व मंदिरांची रचना सारखी असून ती कमी जास्त आकाराची आहेत. सर्व मंदिरे भाजलेल्या मातीची आणि मजबूत बैठकीची आहेत. सदरहू मंदिरे कदाचित कुंभार वाड्यामध्ये बनवून, आगीमध्ये भाजून इथे आणली असावीत किंवा मग त्यांना डोंगर माथ्यावर तयार केलेले असावे. एक मंदिर रचना समजून घेण्यासाठी घेतले असता ते गोलाकार आणि घुमटाकार आहे. मंदिराची उंची दीड फूट, लांबी आणि रुंदी साधारण दोन - दोन फूट इतकी आहे. ही मंदिरे एखाद्या मोठ्या रांजनासारख्या आकारातील आहेत. यांच्या भिंतीची जाडी एक ते दीड इंच आहे. 
      मंदिराच्या भग्न भिंतीची जाडी


      नुकतेच गाळातून काढलेले मंदिर

मंदिराच्या दर्शनी भागात छोटेसे चौकोनी द्वार ठेवलेले आहे. बहिर्भागावर सूर्य, चंद्र, चांदण्या आणि त्रिशूळ या आकृत्या बनवलेल्या असून साधे नक्षीकाम आहे. मंदिराच्या माथ्यावर शिखर बसवलेले असून त्याउलट मंदिराचा खालचा भाग पूर्णपणे मोकळा आणि आतील भाग पोकळ आहे. मंदिरांच्या भिंतींवर श्री.रोडजाई देवी प्रसन्न असे शब्द कोरलेले आहेत. काहींवर ती बनवताना आणि काहींवर डागडुजी करताना ही वाक्ये कोरलेली असावीत. सर्व मंदिरांचा समूह गर्द राईत होता. हल्ली त्यांची डागडुजी, साफसफाई आणि देखभाल करण्यासाठी सुस्थितीतील मंदिरे एका सुरक्षित जागी ठेवून त्यांना कुंपण करण्यात आलेले आहे. 
   काही भग्नावशेष

 •आख्यायिका :-
सदरील मंदिरांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी जनमानसांत बोलल्या जातात. कोणी यांचा संबंध शिवकालीन मंदिरे आहेत असा करतो तर काहीजण असेही म्हणतात की या ठिकाणी वर्षातील एका पौर्णिमा आणि अमावास्येला देवीची गुप्त यात्रा भरते. देवीचे सेवक देवीची पालखी मिरवतात. लख्ख आणि डोळे दिपवणारा प्रकाश होतो वगेरे.

शेजारील गावे, मंदिरांचे स्थान, रचना आणि निरीक्षणे या सर्वांचा अभ्यास केला असता वरील आख्यायिकांच्या विपरीत अशी माहिती समोर येते. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या संतकालीन भारुडामध्ये "रोडगा" शब्द आलेला आहे. जर एखाद्या माणसाने देवीला किंवा कोणत्याही देवाला नवस बोलला असेल तर तो फेडताना देवीला/ देवाला एक विशिष्ठ पद्धतीचा नैवैद्य समर्पित केला जातो आणि नवस फेडला जातो याला "रोडगा वाहणे" असे म्हणतात. सदरील उंच डोंगरावर श्री. रोडजाई देवीचा वास आहे असे मानले जाते पण तिचे बांधीव मंदिर नाही. शिरगांव आणि सर्कलवाडी या शेजारील गावातील ग्रामस्थ याठिकाणी नवस बोलत असत हे फार कमी ज्येष्ठ माणसांकडून समजते. तसेच ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे त्यांनी कुंभार वाड्यामध्ये जाऊन अश्या पद्धतीचे मंदिर बांधून घ्यायचे ते व्यवस्थित भाजायचे आणि सर्व सामग्रीनिशी "रोडगा" वाहण्यासाठी या उंच डोंगरावर जायचे. येथे परंपरागत पूजा करायची, रोडगा वाहायचा, रोडजाई मातेचे नवीन तयार करून आणलेले मंदिर याठिकाणी स्थापित करायचे आणि वर्षानुवर्षे तिथीनुसार त्याची पूजा करण्यासाठी डोंगर चढून वर यायचे. मंदिरांच्या संख्येवरून हा नित्यक्रम वर्षानुवर्षे चालू असावा असे समजते.

सरासरी शंभर किंवा शंभरहून अधिक अशी मंदिरे या ठिकाणी असावीत असा दावा केला जातो. या सर्व माहितीवरून ही मंदिरे लोकांच्या श्रध्देचा विषय राहिलेली आहेत याची जाणीव होते. परंतु याबाबत हातावर मोजता येतील एवढ्याच माणसांना याची तुटपुंजी माहिती असावी याचे मात्र नवल वाटते. असो, काळाच्या ओघात यांची आपल्याला ओळख झाल्यामुळे गाळात रुतली असणारी मंदिरे वर काढली गेली आहेत. काहींची डागडुजी केलेली आहे. जितकी मंदिरे सुस्थितीत आहेत त्यांना सुरक्षित करून काटेरी वनस्पतींचे कुंपण केलेलं आहे. सदर परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. 

मंदिरांचे पूजन करण्यासाठी आणि नैवैद्य दाखवण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. त्यात काही वावगे नाही; ती श्रद्धेचीच गोष्ट आहे. परंतु नैसर्गिक परिसंस्थेत टाकले जाणारे प्लास्टिक, रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स, न कुजनारे कापड आणि बराच कचरा याठिकाणी साठला होता. यामुळे प्रदूषण तर होतेच पण या श्रद्धा स्थळाचे पावित्र्य सुद्धा कमी होते. तरी येथील परिसर स्वच्छ ठेवणे आणि या प्राचीन ठेव्याचे महत्त्व जपणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. पुढील पिढीला सभोवतालचा परिसर, त्याच्याशी निगडित प्राचीन गोष्टी आणि इतिहास यासंबंधी चिकित्सा असते या चिकित्सेच्या शोधातून आणि आकलनामधून व्यक्तिमत्व विकास होत असतो. यासाठीच आपण हा वारसा जबाबदारीने जपायला हवा आणि त्याचे संवर्धन करावे.  

     परिसर स्वच्छता

सोबती
उजवीकडून - निखिल, धीरज, सुशांत आणि निशांत


©शब्दांकन/छायाचित्रे -
प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले (शिरगांव)
८९७५७११०८०