Tuesday, May 3, 2022

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण

तारुण्यातील मुले आणि स्वनियंत्रण


          सध्या जग झपाट्याने बदलत आहे. समाजात वागण्याच्या आणि जगण्याच्या परिभाषा झटपट बदलताना दिसत आहेत. समाज बदलाच्या वेगाबरोबर प्रत्येकाने आपली गती सुद्धा बदलायची आहे याबाबत दुमत नाही परंतु हे बदल करत असताना स्वत:च्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचे भान मात्र प्रत्येक तरुणाला असायला हवे. ऐन तारुण्यात आणि उमेदित अगदी नगण्य वाटणाऱ्या चुकांमुळे तरुणांना आपले प्राण गमवावे लागणे याची असंख्य उदाहरणे रोज प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर आपण पाहत असतो. दुर्दैवी घटना घडणे, त्यांवर शोक करणे, श्रद्धांजली वाहणे, दुःख करत बसणे, शेवटी पश्चाताप होऊन घटनांचा विसर पडणे आणि पुनश्च: अश्या घटना घडणे हा नित्यक्रम चालूच आहे. याचे कारण म्हणजे अश्या घटनांमागील काही चुका, त्यांची कारणे समजावून न घेणे आणि वेळोवेळी आवश्यक असणारे स्वनियंत्रण मोहाच्या, दुःखाच्या आणि आनंदाच्या आवेगात विसरून जाणे. सदर लेख अनेक घटनांचे निरीक्षण आणि त्यांवर चिंतन करून माझ्या व्यक्तिगत अनुभवांवरून लिहिलेला आहे. 

          घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेस एक कारण असते. विनाकारण जगातील कोणतीही गोष्ट घडत नाही हा विज्ञानाचा नियम आहे. घडत जाणाऱ्या गोष्टी घडायच्याच होत्या, ते आपल्या हातात नाही; जे घडायचे आहे ते कसेही घडणारच अश्या टिपण्या करून आपण त्यांच्या कारणांपासून पळवाटा शोधू लागतो आणि पुन्हा अश्या घटना घडतात केवळ आणि केवळ आपल्या दुर्लक्षामुळेच ! ह्या घटनांना पायबंद घालणे सध्या समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. उमेदीचे मनुष्यबळ जर हकनाक वाया जात असेल तर ते प्रामुख्याने कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान आहे हे मान्य करावे लागेल. यासाठी समाज प्रबोधन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी तरुण- तरुणींनी, पालकांनी आणि समाजातील जबाबदार व्यक्तींनी आता सतर्क व्हायलाच हवे कारण दुर्दैवी घटना कोणाच्या घरात कधी घडेल हे सांगता येत नाही.

कोणत्या गोष्टी जास्त धोकादायक आहेत?

१) भौतिक गोष्टी :-

          आपणास उपयोगी असणाऱ्या काही भौतिक गोष्टीं किंवा कृतींचा अतिवापर तसेच चुकीचा वापर झाल्यामुळे जीवितास हानी पोहोचते. यांमध्ये वाहने (दुचाकी, चारचाकी इ.), मोबाईल, अग्नी संबंधित कामे, पाणी आणि पाण्यातील पोहणे (नदी, कॅनॉल, विहिरी, इ.), कीटकनाशके(शेतीची रसायने इ.), अनोळखी नैसर्गिक जागा अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात. या गोष्टींना पालकांनी, तरुण - तरुणींनी व अजाणत्या मुलांनी हलक्यात घेऊ नये. यांबाबत सतत सतर्क राहायला हवे. कारण या गोष्टी जेवढ्या उपयोगी आहेत तेवढ्याच प्रमाणात अतिसंवेदनशील आणि धोकादायक आहेत. 

          प्रत्येक पालक आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांचे प्राथमिक कर्तव्य हे आहे की वर उल्लेख केलेल्या गोष्टींना अनुसरून, त्यांनी आपली मुले कुठे आहेत आणि काय करत आहेत याबाबत सतर्क राहावे. सतर्क रहायलाच हवे कारण नंतर सतर्कता येते पण पोटचे मूल माघारी येऊ शकत नाही. मुले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती जसे की तिथे काही धोका आहे का, आजूबाजूला माणसे आहेत का याची काळजी घ्यावी. या गोष्टींचा विचार करून सहसा मुलांना एकटे सोडू नये; जरी तो नवतरुण असेल तरी. आपली मुले आणि नवतरुण यांच्यावर अतीआत्मविश्वास दाखवू नये. असे केल्याने मुलांना धोकादायक गोष्टींचे भान व भय राहत नाही आणि घटकेत अघटीत घडू शकते. आपल्या पालकांचा आपणास सर्व गोष्टींत होकार आहे असे समजून मुले त्वेषाने आयुष्याचा आनंद घेण्यात गुंग होतात यासाठी मुलांवर पालकांची थोडी तरी जरब असणे गरजेचे आहे. काही पालक प्रेमापोटी मुलांना इतकी मोकळीक देतात तेव्हा एक वेळ अशी येते की मूले किंवा तरुण पालकांचे काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत जाऊन पोहोचतात, ते स्वत:ला परिपूर्ण समजण्याची चूक करतात. हे घडूच नये यासाठी मुलांना वेळोवेळी कडक शासन करणे, कान उघाडणी करणे आणि बरे - वाईट समजावून सांगणे हे आपले कर्तव्य मानून लहान वयापासूनच शिस्तीचे प्रशिक्षण चालू करावे.

          आपल्या मुलांना इतरांच्या जबाबदारीवर कधीच सोडू नये. आपले पाल्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. अघटीत घडल्यास कोणीही त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही याचा विचार करावा. दिवसाचा निश्चित असा वेळ मुले, तरुण आणि तरुणींच्या दैनंदिन कामे आणि हालचालींसाठी राखून ठेवावा. नेहमी चौकशी करावी. सूचना द्याव्या. फायदे - तोटे आणि धोके वारंवार सांगावेत. वरील गोष्टींचा कधीही कंटाळा करू नये कारण या जीवनावश्यक बाबी आहेत. पालकांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवू नये कारण नंतर पश्र्चाताप करून काहीही फायदा होत नाही वेळ निघून गेलेली असते. त्याआधीच सावध झालेले बरे.

२) भावनिक गोष्टी :-

          मानवी जीवितास हानिकारक असणाऱ्या काही भावनिक गोष्टी समजावून घेऊ. दुःखावेग, आत्महत्या, मोह, प्रसिद्धीचा लोभ आणि मुक्त विलासी जीवनाची आवड या आणि इतर बरेच मनातील अनेक गुंतागुंतीच्या विचारांनी बनलेल्या भावनिक गोष्टी आहेत. आपली तरुण मूले भावनिक आणि संवेदनशील असावीत पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संवाद ठेवता आला पाहिजे. पालक आणि पाल्य यांच्यात मोठी विचारदरी नसावी.  त्यांनी प्रत्येक गोष्टीची आणि आपल्या विचारांची पालकांसोबत चर्चा करायलाच हवी. मनातील लाजेची भावना आणि न्यूनगंड सोडून द्यायला हवा. असे न झाल्यास मूले वाईट मार्गांतून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात की जे त्यांच्या आयुष्यासाठी धोकादायक असू शकते. मूले किंवा तरुण त्यांच्या समवयस्क मित्रांवर लगेच विश्वास ठेवतात. त्यांना ते जवळचे वाटतात आणि आपण करत असलेली कोणतीही कृती योग्यच आहे असे स्वतःचे मत बनवतात परिणामी अनुभवाच्या अभावी प्राणघातक संकटाना सामोरे जातात. त्यामुळे मुलांबरोबर पालकांचा भावनिक मुक्तसंवाद व्हायलाच हवा. तरुणांना अतिशय हळवे आणि अती कठोर सुद्धा बनवू नये. त्यांना स्वत:च्या भावना आणि स्वतःचे विचार यांवर नियंत्रण ठेवायला शिकवावे. त्यांना विचार करायला भाग पाडावे.

          आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याचा मूले आणि तरुण -तरुणी पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणत्याही गोष्टीपासून आनंद, मजा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी टोकाला जाण्याचा विचार करत असतात. या गोष्टींना विरोध नाही पण हे करत असताना तरुणांनी आपल्या जीवाची काळजी केली पाहिजे. प्रसंगावधान राखले पाहिजे. आपण धोक्याची सीमा ओलांडत तर नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीमध्ये अडकु शकतो, करत असलेल्या गोष्टीमुळे काय वाईट परिणाम होऊ शकतात याच्यावर आधी विचार करावा तदनंतर कृती करावी. आपले भविष्य आणि कुटुंबातील व्यक्ती यांचे पुढे काय होईल याचा एकदा विचार करावा. भावना सर्वांनाच असतात पण आयुष्य त्याचेच सफल होते ज्याने आपल्या भावना स्वतःच्या नियंत्रणात ठेवल्या आहेत. शेवटी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात झाली की तिचा अंत निश्चित असतो. त्यासाठी स्वनियंत्रण हवे.

काय आहे स्वनियंत्रण ?

          स्वनियंत्रण म्हणजे खूप अवघड संकल्पना नाही. "स्वनियंत्रण म्हणजे कोणतीही गोष्ट करताना वेळेचे, काळाचे, परिणामांचे भान ठेवून विचारपूर्वक केलेली कृती." समजा एखाद्या तरुणाला खूप दुःख झालेले असेल तर त्याने आवेगात पावले उचलू नयेत. थोडा वेळ जावू द्यावा. कारण आणि परिणामांचा विचार जरूर करावा. वर्तमान स्थितीत आपणावर कोणती जबाबदारी आहे याचे भान ठेवावे आणि योग्य ते मानसिक संतुलन राखावे. यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

          तरुण वयात मुलांमधे प्रचंड उर्मी आणि शक्ती असते. रसरसत असणारी ही शक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते यात अनैसर्गिक असे काहीच नाही. परंतु या शक्तीला विवेकाने म्हणजे काळजीपूर्वक हाताळावे लागते. स्वतःला नियंत्रणात ठेवावे लागते. नाहीतर हीच शक्ती नियंत्रणाबाहेर गेली की घात करते याउलट तिच्यावर नियंत्रण असेल तर प्रगती साधते. संयम अंगी असेल तर हे साध्य होईल. उतावीळ मुलांना किंवा तरूणांना आयुष्य दगा देऊ शकते.

अजाणत्या आणि तरुण मुलामुलींसाठी काही आचरण मुद्दे :-

१) आपणास अजून खूप जगायचे आहे. कुटुंबाचे आपण आधारस्तंभ आहोत ही भावना असावी. आपण करत असलेली गोष्ट अंतिम नाही हे समजून घ्यावे.

२) निसर्ग माणसाचा फालतू आत्मविश्वास कधीही सहन करत नाही. भावनेच्या भरात कोणावरही अगदी स्वतःवर सुद्धा अतीआत्मविश्वास ठेवू नये. 

३) आपल्या कमतरता स्वतःला आणि पालकांना वेळोवेळी माहिती असाव्यात.

४) वडीलधारे, पालक आणि शिक्षक यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या योग्यच असतात. त्यांना तुमच्यापेक्षा आयुष्याचा जास्त अनुभव आहे. ते अनेक बऱ्या- वाईट घटनांचे साक्षीदार असतात. त्यांच्या शब्दांना डावलून आपलेच खरे करू नये. भविष्यात तीव्र पश्चाताप होतो.

५) अनोळख्या नैसर्गिक जागा किंवा अशी स्थळे ज्याचा आपल्याला अंदाज नाही तिथे मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. एक चूक आत्मघातकी ठरू शकते.

६) अतिशय आनंदात, तीव्र दुःखात आणि मोहाच्या अवस्थेत असताना चांगले घडायचा एकच मार्ग असतो तो म्हणजे स्वत:ला शांत ठेवणे. ज्याला स्वनियंत्रण जमले त्याने धोक्याची पातळी कमी केली असे म्हणावे लागेल.

७) कमी अनुभवाने, हट्टाने, पालकांच्या विरोधात जाऊन केलेली प्रत्येक वाईट गोष्ट भविष्यात स्वत:ला आणि कुटुंबाला असह्य पश्चाताप आणि मानसिक दुःख देऊ शकते याची कितीतरी उदाहरणे आपणास समाजात पाहायला मिळतात.

८) सावधान!  आयुष्य एकच आहे, शरीर सुध्दा एकच आहे त्याची विचारपूर्वक काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपली एक चूक आपणास आपल्यांतून हिरावून नेऊ शकते. 

          आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपणास अक्षय्य सुख, आनंद आणि आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण, पालक आणि तरुण तरुणी यावर चिंतन करतील असा विश्वास बाळगून लेखन प्रपंच थांबवतो.


- लेखन 
प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
(किसन वीर महाविद्यालय, वाई)
8975711080



3 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. Thank you so much sir for all your efforts and time.I feel extremely grateful to have you as my teacher 🙏And It is such a precious and enormous guidance to all of us and I think for all young generation 🙏Thank you once again.

    ReplyDelete