Monday, April 26, 2021

शिरगांवच्या पांडवकालीन गुहा

"शिरगांवच्या पांडवकालीन गुहा"

                                 •गुहेचे प्रवेशद्वार

          आमचे गाव शिरगांव ता.वाई हे तालुक्याचे सर्वात पूर्वेकडील गाव असून गावाच्या चारही बाजूंना डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे गाव निसर्गाने परिपूर्ण आहे. गावाच्या उत्तरेकडे कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चवणेश्र्वर चा डोंगर आहे. पूर्वेस गावाचा मुख्य डोंगर असून या डोंगरात वाई - वाठार मार्गावरील तीन किमी लांबीचा शिरगांव घाट आहे.

          शिरगांव मध्ये अनेक मंदिरे, मठ आणि प्राचीन बांधकामे अजूनही सुस्थितीत आहेत. यापैकी एक वास्तू उत्तरेकडील डोंगर रांगेमध्ये खोदलेली आहे. गावाच्या उत्तरेकडे असणारा डोंगर गावापासून लांब अंतरावर असल्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी एका टेकडीच्या मागील बाजूस सहसा नजरेस न पडणाऱ्या आणि पाषाणात खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात.


                   •शिरगांवच्या उत्तरेकडील डोंगर 

•रचना:-
          सदरील पाच गुहा एका मोठ्या गुहेचे भाग असून ही गुहा अखंड पाषाणात खोदलेली आहे. गुहेचे द्वार उत्तरमुखी असून चवणेश्र्वर कडे मुख असलेले आहे.  संपूर्ण गुहेची लांबी साधारण ६ मीटर, रुंदी ३ मीटर आणि उंची २ मीटर असून गुहेमध्ये १ मीटर उंचीपर्यंत पाणी साठू शकते. पाण्याने गुहा भरल्यावर ज्यादा झालेले पाणी एका झऱ्याला मिळते. पाण्याचे टाक सदृश्य असणाऱ्या या गुहेची पाणी साठवण क्षमता साधारण १६-१८ घन मीटर (१६-१८००० लिटर) एवढी आहे. या गूहेसाठी पाण्याचा स्त्रोत म्हणजे गुहेच्या पूर्वेकडील भिंतीवरील अंतर्गत वाहणारा पाण्याचा झरा. आजही एप्रिल- मे महिन्यामध्ये तीव्र उन्हाळ्यात पाण्याचा एक स्रोत गुहेच्या छतातून वाहत असतो. विशेष म्हणजे हा स्रोत ऐन उन्हाळ्यात सुध्दा कमी क्षमतेने का होईना चालू असतो ही बाब अधोरेखित करावीशी वाटते.
 
                        •अंतर्गत रचना आणि खांब

          गुहेला मध्यभागी समान अंतरावर चार खांब आहेत. प्रत्येक खांबाची लांबी आणि रुंदी सरासरी अनुक्रमे १.५ फूट असून खांबाची उंची २ मीटर आहे. हे खांब चोकोनी असून काटकोनात कोरलेले आहेत. चार खांबानी गुहा विभागून तिच्या पाच खोल्या बनवल्या आहेत. प्रत्येक खोलीचे घनफळ असमान खोदकामामुळे कमी जास्त आहे. चार खांबांवर गुहेच्या वरील डोंगराचा भार विभागला आहे. गुहेत पाण्याच्या स्त्रोतांमुळे अधोमुखी लवणस्तंभ तयार झाले असून यांची सरासरी उंची ५ ते ६ सेमी आहे. गुहेचा तळ दगडी असल्यामुळे सहसा पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते. पाण्यामध्ये सध्या जलचरांचे वास्तव्य आहे.

                 •पाण्याचा साठा(२४ एप्रिल २०२१)

•गुहा/टाक बांधण्याचा हेतू :-
          डोंगरातील या भागात उन्हाळयात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. प्राचीन काळी जेव्हा घाट रस्ता नव्हता तेव्हा येण्या - जाण्यासाठी घाट माथ्यावरून गावाकडे येण्यासाठी पायवाट असावी. ही पायवाट या गुहांच्या शेजारून जात असावी. पांथस्थ आणि इतर जीवांना पाणी मिळावे या हेतूने कदाचित या गुहा खोदून तयार केल्या असाव्यात. प्राणी, पक्षी, पाळीव जनावरे आणि मनुष्यांना पाणी मिळावे हा एक उद्देश नाकारता येत नाही. 

•आख्यायिका/दंतकथा :-
          सदरील गुहांबाबत काही आख्यायिका व दंतकथा प्रचलित आहेत. त्यामधील प्रथम आख्यायिका म्हणजे, जवळच असलेल्या चवणेश्र्वर तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे बांधकाम करून अज्ञातवासात असलेले  पांडव पुढील प्रवासासाठी निघताना डोंगर उतरल्यावर त्यांनी ह्या गुहा बांधल्या असाव्यात. यामुळेच गावामधील बहुतांशी लोक या गुहांना पाच पांडवांच्या गुहा मानतात. या गुहांचे बांधकाम करून तिथे वास्तव्य करून पांडव पुढील प्रवासासाठी देगाव आणि किकली कडे मार्गस्थ झाले अशी समजूत आहे.

                             •वनस्पती विविधता
          अजून एक आख्यायिका म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या चवणप्राश उत्पादनाचे नाव चवण ऋषींच्या नावावरून ठेवलेले आहे. ज्यांच्या नावावरून भुईंज गावाला भुईंज हे नाव मिळाले त्या भृगुऋषिंचे पुत्र म्हणजे चवण ऋषी. चवण ऋषींचे आयुर्वेदातील योगदान प्रचंड आहे. या चवण ऋषींचे वास्तव्य वनौषधींनी परिपूर्ण असणाऱ्या या डोंगर भागात होते. येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात. यांचा वापर करून चवण ऋषींनी आयुर्वेदातील काही औषधे बनवली होती. त्यांच्या वास्तव्यामुळे चवणेश्र्वर हे नामकरण झाले आहे. चवण ऋषींचे वास्तव्य आणि तपश्चर्येचे ठिकाण म्हणून सुध्दा या गुहांकडे पाहिले जाते. अशा काही इतिहासाशी मिळते जुळते घेणाऱ्या आख्यायिका जनमानसात पसरल्या आहेत.

          नैसर्गिक वैविध्य असणाऱ्या या डोंगरांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरीसृप आणि वनस्पती पहावयास मिळतात. कडक उन्हाळयात सुध्दा थंडगार पाण्याची सोय या गुहा करतात. 

                   •डोक्यावर तुरा असणारा गरुड
                     •मोर आणि मादी पाऊलखुणा 


          गुहांमध्ये कोरीव काम नसल्यामुळे त्या नक्की कोणत्या काळात आणि कोणी बांधल्या याची माहिती सापडत नाही. खूप कालावधीसाठी झाडाझुडुपांमध्ये गायब झालेल्या या गूहा हल्ली ओळखीच्या झाल्या आहेत. तेथील वातावरणात कमालीची शांतता आहे. निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास येथे होतो.  निसर्ग आणि मानवी स्थापत्य यांचा मेळ झालेले हे ठिकाण इतिहास प्रेमींसाठी नक्कीच आवडीचे ठरेल. 


© प्रा. अनिकेत दत्तात्रय भोसले
    शिरगांव
    ८९७५७११०८०

17 comments:

  1. अप्रतिम लेखन
    - कुणाल

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेखन
    - कुणाल

    ReplyDelete
  3. अप्रतिम वर्णन. सदर वास्तूच्या प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण करुन अतुलनिय लेख लिहला आहे.

    ReplyDelete
  4. अप्रतिम वर्णन. सदर वास्तूच्या प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण करुन अतुलनिय लेख लिहला आहे.

    ReplyDelete
  5. अप्रतिम वर्णन. सदर वास्तूच्या प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण करुन अतुलनिय लेख लिहला आहे.

    ReplyDelete
  6. खुप छान माहिती 👌👌

    ReplyDelete
  7. खुप छान माहिती आणि ऐतिहासिक शब्दरचना एकदा बावधन ला ही अशीच भेट दे ...
    अभ्यास करण्यासारखे खूप आहे गावात...🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️

    बाकी खूप छान वाटले वाचून

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. मस्त माहिती संकलन..👌 तीन वर्षांपूर्वी या ठिकाणाला भेट दिली होती.. हे ठिकाण पुरातन खांब टाके असून, याला चार खांब कोरलेले दिसतात.. सातवाहन कालखंडात किंवा त्यानंतरच्या राजवटीत हे खांब टाके कोरलेले दिसते.. पुरातन काळी वाई येथून (कोरेगाव भागात) जाण्यासाठी नक्कीच इथून प्राचीन व्यापारी मार्ग असावा.. येथे कोरलेल्या पुरातन खांब टाक्यावरून निदर्शनास येत.

    ReplyDelete
  10. सगळी माहिती वाचून खूप छान वाटले साक्षात त्या ठिकाणाला भेट दिल्या सारखे वाटले. आशा ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपल्याला नक्कीच निर्भयपणे जगण्याची व काहीतरी करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या प्राचीन कालीन वास्तू खूप काही सांगून जातात.

    ReplyDelete
  11. फोटो आणि माहिती संकलन खूप छान अभिनंदन

    ReplyDelete
  12. आपल्या या शिरगाव गावातील निसर्गाचे वर्णन आपण खूप छान व सुसंगत शब्दांत मांडले आहे.

    ReplyDelete