Friday, April 30, 2021

शिल्पकार

शिल्पकार


         सकाळची वेळ होती. विद्याधर चे बाबा सगळीकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. खूप वेळ झाला त्यांची शोधाशोध चालूच होती. काहीसं न राहवून त्यांनी मला विचारलं, "शारदा... ए....शारदा, माझा चष्मा पाहिलास का ग कुठं? खूप शोधाशोध करतोय पण सापडतच नाही."
 "नाही हो ! मलाच हल्ली काही नीटसं दिसत नाही. डोळ्यासमोर अंधुक प्रकाश वाटतो सारखा, तुम्ही विद्यारधरला का विचारत नाही?", मी काहीश्या कातरस्वारत म्हणाले. त्यावर ते म्हणाले, "विद्याधर.... ए....विद्याधर, अरे माझा चष्मा पाहिलास का कुठे?" 
"हो बाबा, बाथरूमच्या कट्ट्यावर आहे तो. थांबा मी आणून देतो" असे म्हणून विद्याधर ने बाबांच्या हातात चष्मा आणून दिला.
"अरे, शारदा काय म्हणतेय ऐकलस का?" बाबा विद्याधरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाले.
माझे बोलणे विद्याधर ने आधीच ऐकले असल्यामुळे तो म्हणाला, "हो बाबा. मला माहित आहे आई काय म्हणाली. मला उद्या सुट्टी आहे. उद्याच तिला आपण नेत्र रुग्णालयात घेऊन जाऊयात."

          दोघांच्या चर्चेचे शब्द मनावर चिंतेचे पडसाद उमटवू लागले. "खरंच मला दिसेल का? मला परत हे सुंदर जग पाहता येईल का?" असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते. डोळ्यांसमोर अंधुक प्रकाशामुळे तर मनात अनेक उलट- सुलट विचारांनी अंधार करायला सुरुवात केली होती.

          दुसरा दिवस उजाडला. आज रुग्णालयात जायचा दिवस होता. विद्याधर मला रुग्णालयात घेऊन आला. तिथे डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. काही औषधे आणि डोळ्यात सोडायचे ड्रॉप्स लिहून दिले. तसेच ताबडतोब डोळ्यांचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनची गरज पाहून डॉक्टर म्हणाले, "बुधवारी आपल्याकडे अमेरिकेहून निष्णात नेत्रविकार तज्ञ डॉ. एम.के. येणार आहेत. त्यांच्याकडून आपण हे ऑपरेशन करून घेणार आहोत." तुम्ही बुधवारी रुग्णालयात हजर रहा. 
घरी आल्यानंतर विद्याधर आणि त्याचे बाबा यांच्यामध्ये माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन विषयी सांगोपांग चर्चा झाली आणि ऑपरेशन गरजेचेच आहे असे एकमत होऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय पक्का झाला. 

          ठरल्याप्रमाणे विद्याधर मला ऑपरेशनकरिता रुग्णालयात घेऊन आला. उपचारासाठी आलेले सर्वच नेत्ररूग्ण आणि त्यांचे नातेवाईक खूप वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. नेहमी वेळेमध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना आज का एव्हढा उशीर होत आहे याबाबत सगळेजण कुजबुज करत होते. "आम्ही खूप लांबून आलो आहोत, उपाशी, तापाशी आलो आहोत, यांना काय त्याचं, उगीच उशीर करतात, वगैरे वगैरे" अश्या नाना प्रकारच्या आरोपांच्या फैरी झडत होत्या. महिनाभरापूर्वी घेतलेल्या अपॉइंटमेंट नंतरही अशी वाट पाहावी लागल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले होते आणि डॉक्टरांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. नेहमी दहा वाजता येणारे डॉक्टर आज साढे अकरा ते बारा च्या दरम्यान आले. 

          डॉक्टरांच्या आगमनाने सर्वजण आनंदित झाले. मरगळलेले चेहरे आशेचा किरण पाहून पुन्हा टवटवीत झाले. डॉ. एम. के. आल्यामुळे सगळ्या चर्चा हवेत विरून गेल्या आणि कोणाला सर्वप्रथम आत बोलावले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. तेवढ्यात कंपाऊंडरने मला आतमध्ये येण्याची सूचना केली. आत गेल्यानंतर डॉक्टरांनी माझे डोळे तपासले. ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतले. या सगळ्या कालावधीमध्ये मला मनातून एक अनामिक भीती वाटत होती. "खरंच मला दिसेल की उरलेलं आयुष्यही अंधारातच व्यतीत करावं लागेल?" अश्या शंका- कुशंका मनात येत होत्या. पण एखादं स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरावं तसं झालं आणि माझं ऑपरेशन झालं. काही कालावधीनंतर माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या पट्ट्या काढून टाकण्यात आल्या. डोळे हळूहळू उघडल्यानंतर मला सगळीकडे प्रकाश दिसू लागला. अंधाऱ्या खोलीत जीवन व्यतीत करताना अचानक एखादे कवाड उघडे व्हावे आणि आपले आयुष्य प्रकाशाने उजळून निघावे अशी भावना मनात सर्वप्रथम आली. विद्याधर मला स्पष्ट दिसू लागला. मला खूप आनंद झाला होता. पण ज्या डॉक्टरांनी माझे ऑपरेशन केले होते ते मात्र तिथे उपस्थित नव्हते. त्यांचे आभार मानायचे होते पण नाईलाज होता. डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी कंपाऊंडरने बिलाऐवजी मला एक चिठ्ठी आणून दिली. मी मोठ्या कुतुहलाने आणि थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. त्यामधील अक्षरे स्पष्ट दिसत होती...

प्रिय बाई,
          चि. महेशचा आपणास साष्टांग नमस्कार. बाई तुम्ही मला ओळखू शकत नव्हता पण मी मात्र तुम्हाला ओळखले. मला तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर पट्टी काढली की तुम्ही मला नक्की ओळखाल याची मला पूर्ण खात्री होती. तुमच्या डोळ्यांतून आनंदाश्रु येतील आणि डोळ्यांच्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशन साठी कोणतेच अश्रू लगेच येणे अनुकूल नसते याची मला जाणीव होती त्यामुळे मी तुमच्या समोर थांबलो नाही त्याबद्दल क्षमा करावी.

          तुम्हाला कदाचित आठवत नसेल २५ ते ३० वर्षांपूर्वी मी तुमच्या वर्गात शिकत होतो. शाळेकडे माझे दुर्लक्ष झाले आणि मी आईबरोबर गुरे राखण्यासाठी माळावर जायला लागलो. शाळा आणि माझ्यातील अंतर वाढायला लागले होते. अश्या परिस्थितीत तुम्ही मुलांमार्फत मला निरोप पाठवले. शाळेत येण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु मी शाळेत आलो नाही. शेवटी न राहवून, आपल्या एका विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी आणि मला शिक्षणाच्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही स्वतः  सर्व मुलांना घेऊन माळावर आलात. मला सर्वांनी उचलून शाळेत आणलं होतं. माझी नाना प्रकारे समझुत घातली होती. तू खूप हुशार आहेस, अभ्यास केलास तर खूप मोठ्या पदावर जाशील असा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागवला आणि खरोखरच बाई तुमचे शब्द खरे ठरले. एखाद्या न जाणत्या जखमी पाखराला घरी आणावं, त्याला प्रेम आणि माया द्यावी, त्याची काळजी घ्यावी आणि पंखात बळ आलं की पाखरानं दूर आकाशी झेप घ्यावी असाच काहीसा हा माझ्या आयुष्यामधील न  विसरण्याजोगा प्रसंग !

           आज एकच खंत वाटते, तुम्हाला ओळख करून न देताच मी परदेशी आलो आहे. आपल्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थांबलो नाही. परंतु ज्या व्यक्तीने मला घडवलं, माझ्या आयुष्याची सुरुवात करून दिली, धैर्य आणि आत्मविश्वास दिला त्या व्यक्तीला गुरुदक्षिणेच्या मोबदल्यात मला सेवा देता आली हेच माझे परमभाग्य आहे असे मी समजतो! खरंच बाई तुम्ही माझ्या जीवनाच्या शिल्पकार आहात. मी पुन्हा येईन तेव्हा अवश्य तुमची भेट घेईन. तुमचा पत्ता मी लिहून घेतलेला आहे. तुम्ही काळजी घ्यावी आणि आनंदी रहावे. तुम्हाला पुनश्च: एकदा नमस्कार !

तुमचा लाडका विद्यार्थी !
डॉ.एम.के.

शब्दांकन 
©प्रा.अनिकेत दत्तात्रय भोसले
८९७५७११०८०

1 comment:

  1. सर,पत्र खूप छान लिहिले आहे. पत्रात लिहिल्याप्रमाणे ;आपल्या गुरुवर्यांनी केलेल्या उपकारांची आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे.

    ReplyDelete